आम्हाला विरोध, मग काँग्रेसवाले गुणांचे पुतळे आहेत का? - ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 05:50 AM2019-04-22T05:50:00+5:302019-04-22T05:50:49+5:30
आम्हाला विरोध असेल, तर मग काँग्रेस-राष्ट्रवादीवाले गुणांचे पुतळे आहेत का, असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता रविवारी धारावीच्या प्रचारसभेत केला.
मुंबई : काहीजण नुसतच सांगतात, यांना मत देऊ नका. मग कोणाला मत द्यायचे ते तरी सांगा. आम्हाला विरोध असेल, तर मग काँग्रेस-राष्ट्रवादीवाले गुणांचे पुतळे आहेत का, असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता रविवारी धारावीच्या प्रचारसभेत केला.
आम्ही जे वचन देतो ते पूर्ण करतो, म्हणून गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे, असा दावाही त्यांनी केला आणि पूर्ण केलेल्या योजनांची माहिती दिली. दक्षिण मध्य मुंबईतील युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. पन्नास-साठ वर्षांत काँग्रेसने देशावर दरोडा घातला. जनता काँग्रेसवाल्यांचा भ्रष्टाचार कधी विसरू शकत नाही. काँग्रेसवाल्यांनी अतिरेक्यांना पुन्हा पाकिस्तानात सोडून दिले. युती सरकारने मात्र पाकिस्तानात घुसून त्यांचा पाडाव केला. काँग्रेसवाले देशद्रोहाचे कलम काढून टाकणार आहेत. आम्ही देशद्रोह्यांना गाडून टाकणार आहोत. राहुल गांधी म्हणतात ३७० कलम आम्ही काढणार नाही. असले देशद्रोही कलम काढायचे नाही, तर मग जवानांनी कशासाठी लढायचे, असा सवालही त्यांनी केला.
युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांची जन्मभूमी धारावी आहे. काँग्रेसच्या उमेदवाराने धारावीतून निवडून येऊन फक्त थापा मारल्या. मुंबईची निगा राखणारे लोक धारावीत राहतात. त्यांची निगा आपल्याला राखायची आहे. योजना या फक्त कागदावर राहणार नाहीत, त्या अंमलात आणल्या जातील, हा शिवसेनेचा शब्द आहे. राहुल शेवाळे यांनी ‘मेड इन धारावी’च्या माध्यमातून धारावीला ब्रँड दिल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
आठवलेंचा आघाडीवर हल्लाबोल
शिवशक्ती आणि भीमशक्तीला बाळासाहेबांनी नटवले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला आम्ही हटवले, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर हल्ला चढविला. आठवलेंनी या वेळी सादर केलेल्या कवितांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. शिट्ट्या टाळ््यांच्या कडकडाटात कार्यकर्त्यांनी त्यांना दाद दिली.