कायदे मागे न घेतल्यास आंदोलन शहरांपर्यंत; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 06:17 AM2021-01-30T06:17:27+5:302021-01-30T06:17:45+5:30
राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या आंदोलनात सर्व प्रकारे मदत करील. शेतकऱ्यांनी संघर्ष करावा.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यात आले नाहीत तर शेतकऱ्यांचे आंदोलन शहरांतही पोहोचेल, असा इशारा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारला दिला. सरकारने गैरसमजातून बाहेर यावे कारण आंदोलक शेतकरी एक इंचही मागे सरकणार नाहीत, असेही गांधी म्हणाले.
मोदी सरकारवर हल्ला करताना गांधी म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवता त्यांना धमकावले व भीती घातली जात आहे. गांधी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य करून विचारले की, शेतकऱ्यांच्या जमावाला लाल किल्ल्यात कोणी घुसू दिले? शहा यांनी देशाला सांगावे की, आंदोलन करणारे पोलीस बंदोबस्त असतानाही लाल किल्ल्यात कसे शिरले? गुप्तहेर यंत्रणा काय करीत होती? पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे, तिन्ही कायदे मागे घेऊन त्यांची शेतकऱ्यांशी चर्चा व्हावी. काँग्रेसदेखील कृषिक्षेत्रात सुधारणा व्हाव्यात या बाजूने आहे; परंतु जो वर्ग यामुळे प्रभावित होईल त्याला विश्वासात घ्यावे लागेल. त्यासाठी काँग्रेस पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या आंदोलनात सर्व प्रकारे मदत करील. शेतकऱ्यांनी संघर्ष करावा.
काँग्रेस पक्षाचा त्यांना पूर्ण पाठिंबा असून तो त्यांच्यासोबत राहील, असेही ते म्हणाले. राहुल यांनी मोदी यांना इशारा दिला की, तुम्हाला शेतकऱ्यांचा आवाज ऐकावा लागेल, कारण तो देशाचा आहे. मोदी सरकार मोजक्या भाडंवलदार मित्रांसाठी शेतकरी, मजुरांची भाकरी चोरत आहेत. ही चोरी कोणतीही किंमत मोजून काँग्रेस होऊ देणार नाही. राहुल यांनी हे मान्य केले की, मी आंदोलक शेतकऱ्यांच्या थेट संपर्कात नाही; परंतु पक्षाचे नेते संपर्कात आहेत.