अहमदाबाद – गुजरात विधानसभेच्या ८ जागांसाठी पोट निवडणूक घेण्यात येत आहे. तत्पूर्वी रविवारी प्रचार संपण्यापूर्वी सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या व्हिडीओत माजी आमदार सोमा पटेल यांचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यात भाजपाने १० कोटींपेक्षा अधिक कोणाला दिले नाहीत असं म्हटलं आहे. काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला.
या व्हिडीओत भाजपावरकाँग्रेस आमदार खरेदी करण्यासाठी घोडेबाजार केल्याचा आरोप आहे. एका आमदारामागे प्रत्येकी १० कोटी रुपये दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हिडीओत सोमा पटेल गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपा अध्यक्षांच्या संपर्कात असल्याचं सांगितले आहे. सोमा पटेल या व्हिडीओत ज्याच्याशी संवाद साधत आहेत, त्याचे नाव अंकित बारोट असं सांगण्यात आलं आहे.
अंकित गांधीनगर महानगरपालिकेत नगरसेवक आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये समोर येताच राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची फेरी सुरू झाली आहे. काही मिनिटांनंतर भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटलं की, कॉंग्रेसला पोटनिवडणुकांच्या आठही जागांवर पराभव समोर दिसत आहे. त्यामुळे ते जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडणुकीपूर्वी गोंधळ आणि खोटे बोलणे ही कॉंग्रेसची सवय आहे. सोमाभाईंनी १५ मार्च रोजी राजीनामा दिला होता, तर मी २० जुलै रोजी भाजपा अध्यक्षांची जबाबदारी स्वीकारली होती असं त्यांनी सांगितले.
दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित चावडा, माजी अध्यक्ष अर्जन मोढवाडिया यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली आहे. सोमा पटेल स्पष्ट शब्दात सांगत आहेत त्यांना १० कोटी रुपये दिले आहेत. गुजरातमध्ये मागील २ वर्षात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या २० आमदारांनी राजीनामा दिला आहे. यातील काही जण भाजपात सहभागी झाले आहेत. कुंवरजी बावलिया आणि जवाहर चावडा यांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आलं आहे. तर काहीजण भाजपाच्या तिकीटावर निवडून आले आहेत. अलीकडेच राजीनामा देणाऱ्या ८ आमदारांपैकी ५ जण भाजपाकडून पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत.