नवी दिल्ली : महिनाभरापूर्वी कोरोनाची लागण झाल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे 71 व्या वर्षी निधन झाले. (Ahmed Patel Passes Away) पटेल यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. बुधवारी पहाटे गुडगावच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिग्विजय सिंह य़ांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटेल यांच्या निधनावर शोक व्यक्त करत म्हटले की, त्यांनी अनेक वर्षे जनतेची सेवा केली. तल्लख बुद्धीसाठी ते ओळखले जायचे. काँग्रेस पक्षाला मजबूत बनविण्यामध्ये त्यांची भूमिका होती, ती नेहमी लक्षात ठेवली जाईल. त्यांचा मुलगा फैजल यांच्याशी फोनवर बोललो. अहमद भाईंच्या आत्म्याला शांती लाभो.
प्रियांका गांधी यांचे ट्विटकाँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. अहमद पटेल बुद्धीमान आणि अनुभवी सहकारी होते. त्यांच्याकडून मी नेहमी सल्ले घेत होते. ते एक असे मित्र होते, जे शेवटपर्यंत दृढतेने, ईमानदारीने आमच्या सोबत होते. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, असे त्या म्हणाल्या आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीदेखील श्रद्धांजली अर्पण केली आहे. अहमद पटेल गेले. एक चांगला मित्र, विश्वासू सहकारी गमावला. आम्ही 1977 पासून एकत्र होतो. ते लोकसभेत गेले मी विधानसभेत. आम्हा काँग्रेसींसाठी ते कोणत्याही राजकीय जखमेचे औषध होते. नेहमी हसरे राहणे ही त्यांची ओळख होती., असे ते म्हणाले.
मीडियापासून दूर परंतू...दिग्विजय यांनी आणखी काही ट्विट केली आहेत. कोणीही कितीही रागाने, नाराजीने त्यांच्याकडे गेला असेल तो कधीच असंतुष्ट म्हणून मागे आला नाही. प्रसिद्धीपासून दूर परंतू प्रत्येक निर्णयात सहभागी असायचे. कडू बाबही ते गोड शब्दांत सांगणे त्यांच्याकडून शिकावे. काँग्रेस पक्ष त्यांचे योगदान कधीही विसरू शकत नाही. अहमद पटेल अमर रहे, असे दिग्विजय म्हणाले.
मुलाने दिली निधनाची माहितीअहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विट करुन अहमद यांच्या निधनाची माहिती दिली. आपणास कळविताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे की, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. आज २५ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अल्लाह त्यांना जन्नत नसीब करे, असे फैजल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अंत्यदर्शनसाठी गर्दी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी, असेही पटेल यांनी म्हटले आहे.