नवी दिल्ली - आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच टीएमसीवर देखील निशाणा साधला आहे. "बँड-बाजा पार्टीने आम्हाला भाजपाची बी-टीम म्हणणं सुरू केलंय" असं म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे.
"पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं आम्ही जाहीर केल्यानंतर, एकेकाळी काँग्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँड-बाजा पार्टीने आम्हाला भाजपाची बी टीम म्हणणं सुरू केलं आहे. ममता बॅनर्जी देखील असंच म्हणत आहेत. मी एकमेव आहे ज्याच्याविषयी ते बोलू शकतात? मी कोणाचाही नाही पण जनतेचा आहे" असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तसेच आगामी निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी याआधी जाहीर केलं आहे.
भाजपाचे खासदार साक्षी महाराज हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लोकप्रिय आहे. पुन्हा एकदा ते आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. साक्षी महाराज यांनी यावेळी असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार हल्लोबोल करत निशाणा साधला आहे. मात्र ओवैसीबाबत बोलताना भाजपा खासदाराची जीभ घसरली आहे. त्यांनी एका कार्यक्रमात ओवैसींना "गंदा जानवर" असं म्हटलं आहे. तसेच त्यांच्या सारख्या लोकांना देशातील जनता चांगलीच ओळखून आहे असं म्हटलं आहे. भाजपा खासदाराच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
"ओवैसी म्हणजे..., देशाची जनता त्यांना चांगलीच ओळखू लागली"; भर सभेत भाजपा खासदाराची जीभ घसरली
साक्षी महाराज एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. येथे उपस्थितांना त्यांनी संबोधित केलं. यावेळी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) च नेते असदुद्दीन ओवैसींवर त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "अयोध्येत राम मंदिरावर विधान करणारे ओवैसी हैदराबादचे घाणरडं जनावर आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनकाळात मंदिराचं निर्माण सर्वांच्या सहकार्याने होत आहे. ओवैसी रक्ताचे पाट वाहण्याची भाषा करत होते. मात्र मोदीजींच्या शासनकाळात रक्ताचा एकही थेंब न सांडता शांतीपूर्ण पद्धतीनं मंदिर निर्माणाच्या कामाला सुरुवात झाली आहे" असं साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे.