हैदराबाद - महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीला बहुमतापासून वंचित राहावे लागले असले तरीही एमआयएमच्या पाठिंब्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा आहे. हैदराबादचे भाग्यनगर करण्याच्या इराद्याने निवडणूक लढविणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून वंचित राहावे लागले तरीही चार वरून 48 जागांपर्यंत झेप मारली आहे. तर असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या एआयएमआयएम (AIMIM) ला 44 जागांवर यश मिळाले आहे.
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ओवैसी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "जेथे-जेथे अमित शहा, योगी आदित्यनाथ गेले, तेथे भाजपाचा पराभव झाला" असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. 'आम्ही भाजपाशी लोकशाहीच्या मार्गाने लढू. तेलंगणाचे लोक भाजपाला राज्यात विस्तार करण्यापासून रोखतील असा आपल्याला विश्वास आहे" असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
"भाजपाला मिळालेले यश हे फक्त एकावेळेचे यश"
"आम्ही हैदराबाद महापालिकेच्या 44 जागा जिंकलेल्या आहेत. आपण सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांशी बोललो असून त्यांना शनिवारी आपले काम सुरू करण्यास सांगितले आहे. भाजपाला मिळालेले यश हे फक्त एकावेळेचे यश आहे. तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला हे यश मिळणार नाही. आम्ही या निवडणुकीत श्रम घेतले होते. तरी देखील हैदराबादच्या जनतेने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. महापालिकेची निवडणूक आहे, थोडे वर-खाली होत असते. हैदराबादची जनता आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद."
"भाजपावर डेमॉक्रॅटिक स्ट्राइक झाला"
असदुद्दीन ओवैसी यांनी "ज्या ठिकाणी योगी आदित्यनाथ आले होते, तेथे काय झाले? ते सर्जिकल स्ट्राइकबाबत बोलले होते. आता भाजपावर डेमॉक्रॅटिक स्ट्राइक झाला आहे. आकडे सर्वांच्या समोर आहेत. मी मुख्यमंत्री योगींना सांगेन की तुम्ही मुंबईला गेला होतात. तुम्ही अभिनय नका करू. वास्तवाच्या जगात या. लोकावर जे अत्याचार केले ते संपवा. राज्यघटनेच्या विरोधात जात लव्ह जिहाद कायदा बनवत आहात. तो रोखा" असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हैदराबादमध्ये टीआरएस सर्वात मोठा पक्ष; महापालिकेत त्रिशंकू स्थिती, MIM च्या हाती सत्तेची चावी
महापालिकेच्या 150 जागांसाठी 46.6 टक्के मतदान झाले होते. भाजपाने ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची केली होती. गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार केला. योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादचे ‘भाग्यनगर’ करण्याचे विधान करुन मतदारांना साद घातली हाेती. तर अमित शहा यांनी जंगी रोड शो करुन हैदराबादमधील निझामशाही संपवाची आहे, असे वक्तव्य करुन ओवैसी आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर टीका केली होती.