मुंबई : मुंबईविमानतळालगत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मोठ्या अक्षरात ‘अदानी एअरपोर्ट’ लिहिल्यामुळे शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागलेल्या अदानी समूहाने एक पाऊल मागे घेतले आहे. मंगळवारी मुख्य प्रवेशद्वारावरील नामफलकात बदल केल्यानंतर आता विमानतळ परिसरातील दिशादर्शकांवरून ‘अदानी एअरपोर्ट’ नाव पुसून त्याजागी नुसते ‘अदानी’ असे लिहिण्यात आले आहे.मुंबई विमानतळाच्या प्रमुखांना निवेदन देत ‘अदानी एअरपोर्ट’ असे न म्हणता ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ऑपरेटेड बाय अदानी’ असे लिहिण्याची सूचना केली.त्यानंतर अदानी समूहाने आपल्या नावापुढील एअरपोर्ट पुसून केवळ अदानी असे लिहिण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी दुपारी मुख्य प्रवेशद्वारावरील नामफलकाची दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर विमानतळ परिसरातील दिशादर्शक, दुभाजक आणि इतर ठिकाणच्या फलकांमध्येही दुरुस्ती करण्यात आली.
गणवेशातही बदल?अदानी समूहासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गणवेशावरही अदानी एअरपोर्ट असा ठळक लोगो छापण्यात आला होता. त्यावर लहान अक्षरात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे लिहिण्यात आले होते. यावरही आक्षेप घेण्यात आल्याने कर्मचाऱ्यांच्या गणवेशात बदल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रवाशांच्या थेट संपर्कात येणाऱ्यांना सुरुवातीला नवे गणवेश दिले जातील. उर्वरित कर्मचाऱ्यांना पुढील टप्प्यात गणवेश वितरित केले जाणार असल्याचे कळते.