मुंबई – पार्थ पवारांबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार नाराज होतील. तिन्ही पक्षाच्या अंतर्गत वाद आणि बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याचे काही खरे नाही. श्रीगणेश विसर्जनानंतर महाविकास आघाडी सरकारचे लवकरच विसर्जन होईल असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
आज बांद्रा येथील त्यांच्या संविधान निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले यांनी सुशांत सिंग प्रकरण आणि पार्थ पवार यांच्याविषयी भाष्य केले. बॉलिवूड मधील निर्माते दिग्दर्शक कलाकार चांगले असले तरी काही प्रमाणात कलाकारांवर अन्याय होतो. अमिताभ बच्चन सारख्या कलाकाराला ही सुरुवातीला प्रचंड संघर्ष करावा लागला त्यानंतर ते बिगबी झाले. त्यामुळे सुशांत सिंग या कलाकारावर अन्याय झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयद्वारे झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
तसेच मुंबई पोलिसांचा जगात नावलौकिक आहे. त्यातुलनेत सुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास वेगवान झालेला नाही. त्यामुळे पार्थ पवार यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची केलेली मागणी रास्त आहे. यापूर्वीही अनेक प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. त्याचा अर्थ आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही असा होत नाही. मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे. पण एखादे प्रकरण सीबीआय चौकशीसाठी द्यावे ही मागणी करणे म्हणजे मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविणे असा होत नाही. त्यामुळे सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी ही आमची मागणी असल्याचं आठवलेंनी सांगितले.
त्याचसोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षात अंतर्गत वाद आहेत. पार्थ पवारबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार ही नाराज झाले आहेत. तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकारचे लवकरच विसर्जन होईल अशी शक्यता निर्माण झाल्याने महाविकास आघाडीच्या कंपूत भीती आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार पडण्याआधी केंद्र सरकार पडेल असे असबंध विधान केले. सामना वृत्तपत्र चालविणे सोपे आहे मात्र नरेंद्र मोदींशी सामना करणे त्यांना जमणार नाही असा टोला शिवसेनेला लगावत केंद्रातील मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार मजबूत बहुमत असणारे सरकार आहे. या सरकारला २०२४ पर्यंत धोका नाही तसेच २०२४ च्या ही निवडणुका मोदी सरकार जिंकेल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.