मुंबई - अजित पवार नवेनवे उपमुख्यमंत्री झाले तेव्हा मंत्रालयातील लिफ्टमधून वर जात होते. लिफ्टमनला त्यांनी विचारलं, काय! किती पगार मिळतो तुला? लिफ्टमन म्हणाला साहेब! आठ हजार मिळतात. कामगारांना १५ हजार रुपये किमान वेतन असलं पाहिजे असा कायदा असताना चक्क मंत्रालयातच लिफ्टमनला आठ हजार रुपये कसे मिळतात म्हणून अजितदादा अस्वस्थ झाले अन् माहिती घेण्यास त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. माहिती मिळाली की, मंत्रालयात लिफ्टमन, सफाई कामासाठी मनुष्यबळाचं कंत्राट दोन कंपन्यांना दिलेलं आहे. त्या कामगारांना किती पगार देतात, शासन कंपन्यांना प्रत्येक कामगारामागे किती पैसा देत असते, याची विसंगती पुढे शोधली गेलीच नाही. सही एका रकमेवर घेतली जाते आणि हातात कमी पैसे टिकवले जातात, असे काही कामगार दबक्या आवाजात सांगतात. पिळवणूक सुरू आहे. अजितदादा शब्दांचे पक्के आहेत. कामगारांना किमान वेतन दिलं जात नाही, ही स्वत:चीच खंत उशिरा का होईना पण ते दूर करतील अशी अपेक्षा आहे.
आपने हमारा नमक खाया है!मीठ खाणं किंवा खाल्ल्या मिठाला जागणं याला आपल्याकडे खूप महत्त्व आहे. अलीकडेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. नेत्यांच्या घरी त्यांनी चहापान, तर कुठे भोजनाचा लाभ घेतला. मात्र दादा नाशिक सोडून जात नाही तोच पालिकेच्या प्रभाग समितीत भाजपमधील गटबाजी पुन्हा उफाळून आली. गद्दारीचा संशय भाजप नेत्यावर घेण्यात आल्याने तोही आपला बचाव करू लागला. दादा, माझ्या घरी येऊन गेले, मी नमक हरामी कशी करेल? असा प्रश्न या नेत्याने केला, मात्र दुसऱ्या पदाधिकाऱ्याने चूक सुधारत अरे दादा, तुझ्या घरी येऊन गेले ना, मग तुझ्या मिठाचा काय संबंध? असा प्रश्न त्याला केला, त्यावर त्याने दादांनी माझ्या घरचे नमक खाल्ले आहे, त्यांना माझ्या प्रामाणिकपणावर विश्वास आहे, म्हणूनच ना, असे म्हणताच हंशा पिकला.
अमरावतीच्या खासदारांची टी-डिप्लोमसीअमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची टी-डिप्लोमसी लोकप्रिय होत चालल्याने त्या याचा परिणामकारक वापर सामान्यांमध्ये मिसळण्यासाठी करीत आहेत. त्याचा प्रत्यय शनिवारी त्यांच्या पूरस्थितीच्या पाहणी दौऱ्यातही आला. त्याचे झाले असे की, खासदार नवनीत राणा या शनिवारी भातकुली तालुक्यात पुराच्या पाण्याने उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी मार्गातील एक चहा टपरी गाठली आणि अगदी आपुलकीच्या सुरात तेथील लोकांशी संवाद साधला. प्रत्यक्ष खासदार आपल्याशी संवाद साधत असल्याची सुखद अनुभूती लोकांच्या चेहऱ्यावर झळकत होती. एरवी चहा न घेणाऱ्या खासदारांनी सोबतच्या मंडळींना चहासाठी आग्रह करताना स्वत:देखील त्याचा आस्वाद घेतला.
'कुजबुज' या सदरासाठी यदु जोशी, संजय पाठक, गणेश वासनिक यांनी लेखन केले आहे.