सातारा : ‘ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांचे खच्चीकरण करण्याचा कार्यक्रम भाजप नेत्यांनी हाती घेतला आहे. इतर पक्षांतील नेत्यांवर दहशत माजविण्याच्या हेतूनेच राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील घरावर अयकर विभागातर्फे छापा टाकण्यात आला. भाजपचा हा घोडेबाजार सर्वांनाच मारक आहे’ अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.
निवडणुकीच्या तोंडावर अशा धाडी टाकून विरोधकांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न होत आहे. फडणवीस सरकारच्या हातात पाच वर्षे होती, मधल्या काळात असे काही घडले नाही. ही कारवाई निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच करण्यात आली आहे. अशा कारवायांमुळे विरोधकांमध्ये दहशत माजवून त्यांना कमकुवत व नाउमेद करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असून अशा कोणत्याही कारवाईमुळे आम्ही डगमगणार नाही, असा इशाराही पवार यांनी दिला.
मुश्रीफांच्या मागे शुक्लकाष्ठइस्लामपूर : आमदार हसन मुश्रीफ हे अगदी सरळ, साधे व जनतेतील नेते आहेत. त्यांनी कित्येक गोरगरिबांच्या आरोग्याचे प्रश्न सोडविले आहेत. जो सरकारविरोधी बोलतो, सत्ताधारी पक्षाच्या आग्रहास बळी पडत नाही, त्याच्या मागे अशापद्धतीने शुक्लकाष्ठ लावण्याचा सत्ताधारी मंडळींचा प्रयत्न दिसतो. असे छापे टाकून कोणी भीती घालत असेल, तर कागलची जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली.