Ajit Pawar: सीताराम कुंटे आणि जयंत पाटील यांच्यात वादावादी?, अजित पवार म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 02:17 PM2021-05-14T14:17:54+5:302021-05-14T14:18:52+5:30

Ajit Pawar: राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यातील वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar comment on argument between Sitaram Kunte and Jayant Patil | Ajit Pawar: सीताराम कुंटे आणि जयंत पाटील यांच्यात वादावादी?, अजित पवार म्हणाले....

Ajit Pawar: सीताराम कुंटे आणि जयंत पाटील यांच्यात वादावादी?, अजित पवार म्हणाले....

googlenewsNext

राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यातील वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रशासकीय अधिकारी आणि मंत्री यांच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नसून काही आक्षेप असतील तर ते बैठक घेऊन समोरासमोर सोडवले जातील, असं अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar comment on argument between Sitaram Kunte and Jayant Patil )

काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीतही जयंत पाटील यांनी मुख्य सचिवांना लक्ष्य केलं होतं.  जयंत पाटील यांनी मुख्य सचिवांवर हल्लाबोल केल्यानं बैठकीत उपस्थित मंत्री चकित झालं होते. पावसाळ्याच्या तोंडावर विभागाची विविध सिंचन प्रकल्प आणि कालव्यांशी संबंधित काही तातडीची कामे प्रस्तावित आहेत. या कामांना वित्त विभागाची मान्यता मिळाली असून नस्ती मंजूर झाल्यानंतर त्यावर पुढील कार्यवाही करण्याऐवजी कुंटे यांनी या नस्ती पुन्हा वित्त विभागाकडे पाठविल्यावरून पाटील नाराज असल्याचे बोलले जाते. याचबाबत अजित पवार यांनी विचारण्यात आलं असता त्यांनी कोणताही वाद नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. 

"राज्यातील प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांमध्ये उत्तम समन्वय आहे. कोणताही वाद असण्याचं कारण नाही. जयंत पाटील हे अतिशय शांत स्वभावाचे आहेत. उलट मी त्यांच्यापेक्षा तापड स्वभावाचा आहे. अधिकाऱ्यांसोबत काही मतभेद असतील तर ते बैठक घेऊन समोरासमोर सोडवले जातील आणि योग्य त्या सूचना करण्यात येतील", असं अजित पवार यांनी सांगितलं. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. 

पुण्यातील कोरोना स्थितीचा आढवा घेतल्यानंतर अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. यात लसीकरणाच्या मुद्द्यावर अजित पवार यांनी जोर दिला. 

देशात सर्व नागरिकांसाठी लस गरजेची आहे. लसीकरण झालेल्या ठिकाणी कोरोना आटोक्यात आल्याचंही दिसून आलं आहे. पण लस उत्पादन क्षमता मर्यादित आहे. १० कोटींपर्यंत लस उत्पादन करण्याचं नियोजन आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं. 

तहान लागल्यावर विहीर न खोदता, तिसऱ्या लाटेची तयारी सुरू
राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच अनुशंगानं पुण्यातही तिसऱ्या लाटेसाठीची पूर्वतयारी सुरू करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. ऑक्सिजनबाबतची राज्याची १२०० मेट्रिक टनची तयारी आता १८०० ने वाढवायची आहे. प्रशासन यंत्रणा रात्रंदिवस काम करते आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे तहान लागल्यावर विहीर न खोदता, तिसऱ्या लाटेची तयारी याआधीच सुरू करण्यात आली आहे. 

भारत बायोटेकने जिल्ह्यात 28 एकर जमीन मागितली ती देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. तो प्रकल्प सुरू होण्यासाठी तीन महिने लागतील. तिथे तयार होणारी लस निम्मी केंद्राला द्यावी लागेल, पण राहिलेली लस महाराष्ट्राला मिळाली पाहिजे, असा आग्रह अजित पवार यांनी केला आहे. 
 

Web Title: Ajit Pawar comment on argument between Sitaram Kunte and Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.