नाना पटोलेंच्या आरोपांमुळे महाविकास आघाडीत बेबनाव, अजितदादांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केला संताप, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 04:31 PM2021-07-12T16:31:02+5:302021-07-12T16:35:23+5:30
Nana Patole News: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील हे सरकार स्थिर असून, ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून सातत्याने केला जातो. मात्र प्रत्यक्षात महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून बेबनाव होताना दिसत आहे.
मुंबई - शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत राज्यात स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारला आता पावणे दोन वर्षे पूर्ण होत आली आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील हे सरकार स्थिर असून, ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून सातत्याने केला जातो. मात्र प्रत्यक्षात महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून बेबनाव होताना दिसत आहे. आता नाना पटोले (Nana Patole) यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याच्या केलेल्या आरोपांमुळे महाविकास आघाडीत तीव्र मतभेद निर्माण झाले आहे. पटोलेंच्या या आरोपांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar ) हे संतप्त झाले आहे.(Ajit Pawar expressed his indignation directly to the Chief Minister on Nana Patole's Allegations)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता, त्यावर संतप्त प्रकिक्रिया व्यक्त करताना अजित पवार यांनी पटोले यांनी केलेले आरोप खोडून काढले आहेत. तसेच अजित पवार यांनी याबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे संताप व्यक्त केला आहे. अशा आरोपांमुळे महाविकास आघाडीला सुरुंग लागत असल्याची भावनाही अजित पवार यांनी व्यक्त केली.
नाना पटोले यांनी लोणावळ्यामध्ये कार्यकर्त्यांच्या एका सभेवेळी हे वक्तव्य केले होते. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे. आयबीचा, पोलिसांचा रिपोर्ट रोजच्या रोज सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर नेऊन दिला जात आहे. आताही मी कुठे आहे, राज्यात कुठे कुठे काय सुरू आहे, कुठे आंदोलन होत आहे याची माहिती त्यांना पोहोचवली जात आहे. मी स्वबळाचा नारा दिल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने त्यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. आपण त्यांच्यासोबत सरकारमध्ये आहोत, परंतू त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री पदे आहेत. यामुळे त्यांच्याकडून असे यापुढेही होणार आहे, असे पटोले म्हणाले. मी रात्री ३ वाजता दौऱ्यावर निघालो ते देखील त्यांना तेव्हाच माहिती होते, असा आरोप त्यांनी केला होता.