लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यपालांनी विधान परिषदेच्या १२ सदस्यांची नियुक्ती आज करावी, आजच राज्यातील विकास मंडळांना आपले सरकार मुदतवाढ देईल, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत करताच संतप्त झालेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, राज्याच्या मागास भागांना ओलीस ठेवण्याचा हा प्रकार असून ही भीक नाही; आम्ही भिकारी नाही, आमच्या हक्काचं घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत पवार यांच्या विधानाचा निषेध केला. या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्यागही केला.
वित्तमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या मांडल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी या मागण्यांमधील रकमेचे आणि ८ मार्चला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातील निधीचे समन्यायी वाटप राज्यपालांच्या सूत्रांनुसार होणार आहे का, अशी विचारणा केली, तसेच विकास मंडळांना मुदतवाढ देण्याची जोरदार मागणीही केली. मंडळांना राजकीय डावपेचात अडकवू नका, असे ते म्हणाले. त्यावर, अजित पवार यांनी मंडळांना मुदतवाढ देण्याची आमची भूमिका आहे, असे सांगतानाच आधी राज्यपालांनी आमदारांची नियुक्ती करावी, आम्ही लगेच मुदतवाढ देऊ, असे विधान केले.
त्यावर अजित पवार म्हणाले की, राज्यपालांनी बारा आमदारांची नियुक्ती आज जाहीर करावी, आजच मंडळांना मुदतवाढ देऊ. फडणवीस त्यावर चांगलेच संतप्त झाले. अजितदादांच्या मनातलं आज ओठावर आलं. किती राजकारण करता? आमदार नियुक्त्यांचा विकास मंडळांच्या मुदतवाढीशी काय संबंध? हा राज्याचा विषय आहे अन् त्याचे तुम्ही असे राजकारण करत असाल तर जनता माफ करणार नाही. राज्यपाल कोणा एका पक्षाचे आहेत का? आम्ही संघर्ष करू, मंडळं हा आमचा संवैधानिक अधिकार आहे, तो आम्ही मिळविल्याशिवाय राहणार नाही, असे फडणवीस म्हणाले. काँग्रेसचे आ. नाना पटोले यांनी गेल्या पाच वर्षांत विदर्भाचा बॅकलॉग किती वाढला, याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. त्यावर पवार यांनी त्याबाबतची आकडेवारी सरकार मांडेल, असे स्पष्ट केले.‘राज्यपालांची भूमिका संशयास्पद आहे’ (पान ५ वर)
विरोधकांचा सभात्यागआधी आमदार नियुक्ती मग मंडळांना मुदतवाढ, या अजित पवार यांच्या विधानाचा निषेध करत विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला.