Phaltan Vidhan Sabha 2024 Election : महायुतीचे जागावाटप निश्चित होण्याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनीराष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर केला. महत्त्वाचे म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर यांना कॉल करून अजित पवारांनी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान दिपक चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय हालचाली आणि जागावाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. अजित पवारांनी जन सन्मान यात्रेच्या माध्यमातून आधीच विधानसभेची तयारी सुरू केली असून, महायुतीच्या जागावाटपाची घोषणा होण्याआधी पहिला उमेदवारही जाहीर केला आहे.
अजित पवारांनी कॉल करून जाहीर केला उमेदवार
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांनी आमदार दीपक चव्हाण यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. रामराजे नाईक निंबाळकर हे कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे विकासकामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनासाठी गेले होते. रामराजे नाईक निंबाळकर बोलत असतानाच अजित पवारांनी त्यांना कॉल केला. रामराजे नाईक निंबाळकरांनी मोबाईल माईकजवळ धरला आणि त्यानंतर दिपक चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली.
अजित पवार कॉलवर काय म्हणाले?
रामराजे नाईक निंबाळकर यांना कॉल करून अजित पवार म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ चिन्ह देऊन आपण उमेदवार देणार आहोत. दिपक पवार हे आपले उमेदवार आहेत. त्यांना आशीर्वाद द्यावेत. दिपक चव्हाणांना सहकार्य करावे."
दिपक चव्हाण चौकार मारणार?
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून दिपक चव्हाण हे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ३० हजारांचे मताधिक्य घेत भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला होता.
दिपक चव्हाण यांना १,१७,६१७ मते मिळाली होती. भाजपाचे दिगंबर आगवणे यांना ८६,६३६ मते मिळाली होती. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या अरविंद आढाव यांना ५,४६० मते मिळाली होती. आता दिपक चव्हाण यांना चौथ्यांदा उमेदवारी मिळाली आहे, त्यामुळे ते चौकार मारणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.