अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 12:56 PM2024-10-02T12:56:42+5:302024-10-02T12:59:57+5:30
Ajit Pawar Amit Shah Mahayuti: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह मुंबई दौऱ्यावर असून, त्यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यासह भेट घेतली. या बैठकीत झालेल्या चर्चेबद्दलची अपडेट...
Ajit Pawar Amit Shah: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील निकालाने महायुतीला जोरदार धक्का दिला. त्यामुळे महायुती विशेषतः सावध झाली असून, अमित शाह यांनी व्यक्तीशः निवडणुकीत लक्ष घातल्याचे दिसत आहे. अमित शाहांचे गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील दौरे वाढले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागावाटपाबाबतही अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांच्या चर्चा सुरू आहेत. पण, कोणाला किती जागा मिळणार याबद्दल नेते आणि इच्छुकांच्या मनात धाकधूक आहे. अशात आता अजित पवारांनी सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यासह अमित शाहांची भेट घेतली.
अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट आणि चर्चा झाली. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृह येते अजित पवारांनी सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यासह शाहांची भेट घेतली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जास्तीत जास्त जागा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अजित पवारांच्या वाट्याला कमी जागा येतील, अशा चर्चा आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षातील नेत्यांमध्ये धाकधूक आहे. काही नेते शरद पवारांकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
महायुतीतील ८० टक्के जागावाटप पूर्ण झाल्याचे नेते सांगत आहेत, मात्र कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याबद्दल कोणतीही वाच्यता करण्यात आलेली नाही. अजित पवार आणि अमित शाह यांच्यामध्ये जागावाटपाबद्दलच चर्चा झाल्याचे समजते. काही मतदारसंघावरून महायुतीत पेच आहेत. एक जागा आणि अनेक इच्छुक अशी स्थिती आहे. काही मतदारसंघांवर तिन्ही पक्षांकडून दावे केले गेले आहेत. त्यासंदर्भातही चर्चा झाल्याचे समजते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची चिन्हे आहेत. अशात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून महायुतीचे जागावाटप पटकन व्हावे, यासाठी प्रयत्न होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीने जागावाटप आणि उमेदवार जाहीर करण्यास विलंब केला होता. त्याचा फटका निवडणुकीत बसला. ती चूक टाळण्यासाठी आधीच जागावाटप करून उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना महायुतीतील पक्ष देण्याची शक्यता आहे.