Ajit Pawar: ठाकरे सरकारमध्ये मतभेद; यशोमती ठाकूरांकडून अजित पवारांविरोधात नाराजी व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 09:49 AM2021-08-23T09:49:55+5:302021-08-23T09:50:24+5:30
Yashomati Thakur: राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमध्ये बाळापूर तालुक्यातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा संवाद कार्यक्रम महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे आम्हाला साथ देत नसल्याची खंत महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी एका कार्यक्रमात व्यक्त केली. यानिमित्ताने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमध्ये बाळापूर तालुक्यातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा संवाद कार्यक्रम महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी त्या म्हणाल्या, मागील कित्येक वर्षांपासून बालसंगोपनाचे पैसे वाढवले नव्हते. केवळ ४५० रुपये मिळत होते. आपण त्यात वाढ करून ११२५ रुपये केले. यासाठी किमान २५०० रुपये मिळायला हवे, अशी माझी इच्छा आहे. तसा प्रस्तावही आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पाठविला. मात्र, अजित पवार काही आम्हाला साथ देत नाहीत. थोरात यांनी याबाबत मदत केल्यास त्यांचीही साथ मिळेल, असे ठाकूर म्हणाल्या.
शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करणार - थोरात
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमीन संपादित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. यासंदर्भात मुंबई येथे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर करू, अशी ग्वाही महसूलमंत्री थोरात यांनी दिली. तसेच उच्चदाब विद्युत मनोऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.