शिवसेनेसोबत स्थानिक पातळीवर जमवून घ्या; अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना
By मोरेश्वर येरम | Published: December 23, 2020 04:55 PM2020-12-23T16:55:10+5:302020-12-23T16:56:42+5:30
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी अजित पवार बोलत होते.
मुंबई
"आपल्याला शिवसेनेसोबत कायम राहायचं आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत स्थानिक पातळीवर जमवून घ्या", असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी अजित पवार बोलत होते. "महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर स्थानिक पातळीवर खटके उडत आहेत. अशी माहिती माझ्या कानावर आली आहे. पण आपल्याला शिवसेनेसोबत कायम राहायचे आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत जुळवून घ्या", असं अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीला अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री उपस्थित होते.
बैठकीत राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांसोबतही चर्चा झाली. पराभूत उमेदवारांना पक्षात नवी भूमिका देऊन त्यांचा हुरुप वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचं समजतं. पराभूत उमेदवारांना कशामुळे कमी मतदान झालं? त्यामागची कारणं काय आणि भविष्यात काय करता येईल? यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.