लोकमत न्यूज नेटवर्क सिद्धटेक (अहमदनगर) : आमदार रोहित पवार यांचे राजकीय विरोधक असलेले भाजपचे नेते माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासोबत शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर गोपनीय बैठक झाली. दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. मात्र, तो तपशील बाहेर आलेला नाही.
अंबालिका कारखाना हा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात येतो. अजित पवार नेहमी या कारखान्यावर येत असतात. येथील त्यांचा दौराही गोपनीय असतो. याच मतदारसंघातून रोहित पवार हे राम शिंदे यांना पराभूत करून आमदार झाले आहेत. शनिवारी सकाळी पवार या कारखान्यावर असताना शिंदे तेथे आले. दोघांची गोपनीय बैठक झाली. काही प्रत्यक्षदर्शींनी या भेटीस दुजोरा दिला. शिंदे हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात, असे असताना त्यांनी पवार यांची भेट का घेतली, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजप सरकारच्या काळात राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेची सध्या चौकशी सुरू आहे. हे खाते शिंदे यांच्याकडे असल्याने तो संदर्भ या भेटीला आहे का? शिंदे यांच्याशी चर्चा करून पवार हे नगर जिल्ह्यात काही वेगळे आडाखे बांधू पाहत आहेत का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिंदे धनगर समाजाचे नेतृत्व करतात. त्यामुळे त्यांच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न आहे का?, असे विचारले जात आहे. राष्ट्रवादीच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने खासगीत बोलताना ही केवळ सदिच्छा भेट आहे, असे सांगितले.
भेट झाली ही अफवा ‘लोकमत’ने राम शिंदे यांच्याशी संपर्क केला असता ‘अशी भेट झालीच नाही. सर्व अफवा आहेत. मी कर्जतला नसून पुण्यात आहे’ असे ते म्हणाले. मात्र, त्यांनी तपशीलवार बोलणे टाळले.