"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 01:39 PM2024-10-01T13:39:46+5:302024-10-01T13:42:57+5:30
Ajit Pawar : जन सन्मान यात्रेची माजलगावमध्ये सभा झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी भाषण सुरू असतानाच जोरजोरात घोषणाबाजी केली. भाषणात व्यत्यय निर्माण झाल्याने अजित पवार संतापले आणि कार्यकर्त्यांना झापले.
Ajit Pawar News : अजित पवार जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. दरम्यान, मंगळवारी (१ ऑक्टोबर) जन सन्मान यात्रा माजलगावमध्ये असताना अजित पवारांचा संयम सुटला आणि त्यांनी कार्यकर्त्यांना झापले. "आता तू बोलला ना भाषण बंद करून निघून जाईन", अशा शब्दात अजित पवारांनी सुनावले.
माजलगावात जन सन्मान यात्रेची सभा झाली. अजित पवार भाषण करायला आले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणा बाजी सुरु केली. भाषण करताना घोषणांमुळे विचलित झाल्याने अजित पवार संतापले.
तुम्हालाच कळतं का सगळं?
अजित पवारांनी भाषण करायला सुरूवात केली. त्यावेळी एका कार्यकर्त्याने 'एकच वादा, अजितदादा', अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. त्यामुळे उपस्थित इतरही घोषणा देऊ लागले.
अजित पवार थांबले आणि त्या कार्यकर्त्याला म्हणाले, "आता तू बोलला ना, मी भाषण बंद करेन आणि निघून जाईन. फालतूपणा बंद झाला पाहिजे. मघाशी दादांनी पण सांगितले. काही शिस्त बिस्त आहे की नाही?"
"का तुम्हालाच कळतं आणि आम्हाला काही कळत नाही? आम्हालाही कळतं. आम्ही पण तरुणपणात उत्साह दाखवलेला आहे. पण काहीतरी त्याला शिस्त ठेवा ना", अशा शब्दात अजित पवारांनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली.
जयंत पाटलांसोबत घडला होता असाच प्रकार
काही दिवसांपूर्वी शिव स्वराज्य यात्रेच्या सभेत जयंत पाटलांनी तर भाषणच थांबवले होते. जयंत भाषण करत असताना एक कार्यकर्त्याने आताच उमेदवाराचे नाव जाहीर करा, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे जयंत पाटील चिडले आणि त्यांच्या खुर्चीकडे गेले. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी त्यांना भाषण करण्याची विनंती केली.
अकोलेमध्ये झालेल्या या प्रकारानंतर जयंत पाटलांनी त्या कार्यकर्त्याला चांगलेच झापले होते. तुझ्या बुद्धीची कीव करावीशी वाटते", असे पाटील म्हणालेले.