मुंबई - खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाचे स्वागत केले आहे. एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येअजित पवार यांनी स्वागत केले आहे.
खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल. खडसेसाहेब, रोहिणीताई खडसे, त्यांच्यासोबत पक्षप्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी, समस्त कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी पक्षांमध्ये हार्दिक स्वागत. पक्षात आपल्या ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा निश्चित सन्मान होईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
"काही दिवस जाऊ देत, कुणी किती भूखंड घेतलेत ते दाखवेन!"
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी, काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विरोधकांना इशारा दिला.राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे. यावेळी एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
जयंतराव, काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो. मी सांगतो कोणी काय केले? मला कोणालाही जाणीवपूर्वक त्रास द्यायचा नाही. परंतु, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. मी याविरोधात आवाज उठवेन, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले. याचबरोबर, मी खूप संघर्ष केला. हा संघर्ष केवळ भाजपामध्येच नाही, तर अगदी मंत्रिमंडळातही केला. ४० वर्ष काढल्यानंतर एकाएकी पक्ष सोडावासा वाटला नाही. विधानसभा निवडणुकीतही मानहानी आणि छळ करण्यात आला. मी याबाबत वरिष्ठांना सभागृहात पुरावे देण्याची विनंती केली, मात्र आजवर प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, असा दावा एकनाथ खडसे यांनी यावेळी केला.
'त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन'; राष्ट्रवादी प्रवेशानंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला इशारा
40 वर्षात महिलेला समोर ठेवून राजकारण कधी केले नाही, कोणाला समोर ठेवून राजकारण करण्याचा माझा स्वभाव नाही, असं एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले. तसेच माझ्यामागे त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा देखील एकनाथ खडसे यांनी दिला आहे. भाजपासाठी जितक्या निष्ठेने काम केलं, तितकंच राष्ट्रवादीसाठी करणार आहे. भाजपा ज्या वेगाने वाढवला, त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवू, असा विश्वासही एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे मला कोणत्याही पदाची अपेक्षा नसल्याचे देखील एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.