Nawab Malik BJP Shiv Sena: नवाब मलिकांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी भूमिका भाजपने घेतली. पण, अखेरच्या दिवशी नवाब मलिक अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचे स्पष्ट झाले. विरोधकांना हा आयता मुद्दा मिळाल्याचे दिसत असून, आता भाजपने त्यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. आता शिंदेंच्या शिवसेनेनेही निर्णयाचा पुन्हा विचार करावा, अन्यथा आम्ही नवाब मलिकांविरोधात काम करू, अशी भूमिका घेतली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले, "नवाब मलिक यांना आमची जी महायुती आहे, ती पाठिंबा देणार नाही. तिथे आमचा शिवसेनेचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भाजप-शिवसेना नवाब मलिकांच्या विरोधात काम करतील."
"अजित पवार पुन्हा विचार करतील"
"असं होतं. पक्ष आहे. पण, पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस) त्यांना एबी फॉर्म दिला असेल, तर ते त्यावर पुनर्विचार करतील. भाजप आणि शिवसेना नवाब मलिकांच्या विरोधात काम करतील. आम्ही बोललो आहोत. फडणवीस साहेब बोलले आहेत की, नवाब मलिकांच्या विरोधात काम करू. शिवसेनेने जो उमेदवार दिला आहे, त्याच्यासोबत आम्ही असू. अजित पवारांनी निर्णय घेतला असेल, तर ते पुन्हा विचार करतील.
दोन एका बाजूला, एक दुसऱ्या बाजूला
अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतील घटक पक्ष आहे. अजित पवारांनी जाहीर केलेल्या सर्वच उमेदवारांना महायुतीतील घटक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. पण, नवाब मलिकांबद्दल दोन्ही पक्षांनी वेगळी भूमिका घेतली आहे.
नवाब मलिकांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेने सुरेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचाच प्रचार भाजप आणि शिवसेनेकडून केला जाणार आहे. पण, शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कुणाचा प्रचार करणार हेही महत्त्वाचे आहे. या मतदारसंघात शिवसेना भाजप एका बाजूला आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दुसऱ्या बाजूला अशी स्थिती निर्माण झाली आहे.