अजित पवार, तुम्ही माझ्याविरुद्ध लढाच, आता शब्द फिरवू नका :खासदार आढळराव पाटील यांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 08:55 PM2019-01-07T20:55:39+5:302019-01-07T20:57:31+5:30
लोकसभेची निवडणूक अजित पवार तुम्ही माझ्याविरुद्ध लढाच. आता तुम्ही शब्द फिरवून मागे पळू नका,’’ असे आव्हान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांना दिले.
खेड : ‘‘लोकसभेची निवडणूक अजित पवार तुम्ही माझ्याविरुद्ध लढाच. आता तुम्ही शब्द फिरवून मागे पळू नका,’’ असे आव्हान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांना दिले.
पवार साहेबांनी सांगितल्यास आणि पक्षाने आदेश दिल्यास मी शिरूरमधून लोकसभेची निवडणूक लढेन. इतकेच काय, निवडूनही येईन, अन्यथा पवारांची औलाद सांगणार नाही,’ असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर येथील एका कार्यक्रमात रविवारी केले होते. या वक्तव्याचा समाचार घेत आढळराव पाटील यांनी अजित पवारांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून लढण्याचे आव्हान दिले.
पाटील म्हणाले, अजित पवारांच्या पक्षाला आजवर माझ्याविरोधात लढायला सक्षम उमेदवार मिळाला नाही. लिंबू टिंबू उमेदवार उभे केले. अजित पवार हे मोठे नेते नाहीत. त्यांना माझ्याविरुद्ध लढायची खुमखुमी आली आहे. अजित पवारांना आपले खुले आव्हान आहे. अरे ओबामा जरी आले तरी मला फरक पडणार नाही. माझ्याविरोधात लढल्यास तुमचे स्वागत आहेच, मात्र, आता तुम्ही याचे त्याचे नाव पुढे करून रंणागणातून पळ काढू नका. पवारसाहेबांना विचारून तुम्ही सर्व गोष्टी करीत नाहीत आणि पक्षश्रेष्ठी तुम्हीच असल्याने तुम्हास आदेशाची गरज नाही. त्यामुळे अजित पवार तुम्ही माझ्याविरुद्ध लोकसभेची निवडणूक लढून दाखवा आणि शब्द पाळा, असेही आढळराव पाटील म्हणाले.
आम्हीही लढणाऱ्यांचीच औलाद
शिवजन्मभूमितील मी रांगडा मावळा सैनिक आहे. आम्हीसुद्धा लढवय्ये आहोत. छत्रपतींचा इतिहास यास साक्षी आहे. स्वत:च्या मनगटात जोर आहे. दुसऱ्यांच्या ताकदीवर बढाया मारणाऱ्यांची नव्हे, तर लढणाऱ्यांची आम्ही औलाद आहोत. गेली पंधरा वर्षे अव्याहतपणे मी मतदारसंघात काम करतोय. इथल्या मतदारांशी माझी नाळ घट्ट आहे. जनतेचे आपल्यावर प्रेम आहे, कारण त्यांना मी त्यांच्या घरातील व्यक्ती आणि खासदार वाटतो. मी केलेली विकासकामे आणि जनतेचे प्रेम ही माझी ताकद आहे. या ताकदीवर मी कोणाविरुद्धही लढायला तयार आहे. खरे तर आम्ही सुसंस्कृत राजकारणाची कास धरतो आणि जशास तसे उत्तर देण्याची क्षमताही आम्ही ठेवतो, हेही तुम्ही लक्षात घ्या, असे आव्हान आढळराव पाटील यांनी दिले.
इतिहासाची पाने चाळा, अजित पवार, दिलीपराव वळसे पाटील, स्व. आर. आर. पाटील, छगन भुजबळ, स्वत: शरद पवार अशा स्टार कास्टने माझ्याविरुद्ध मतदारसंघात जंग जंग पछाडून मला पराभूत करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मतदारांनी त्यांचे ऐकले नाही. पवारसाहेबांनीही येथून लढण्यासाठी चाचपणी केली होती, हाही इतिहास अजित पवार विसरले असतील तर त्यांचे दुर्दैव आहे. इतिहासाची पाने जरा अजित पवारांनी चाळावीत म्हणजे त्यांना माझाही अंदाज येईल.