अजित पवारांची ‘पॉलिटिकल ऑफर’; दगाफटका होऊ नये यासाठी भाजपा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:11 AM2021-02-15T04:11:48+5:302021-02-15T09:54:14+5:30

NCP & BJP Political Happening in Pune: स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड लवकरच केली जाणार आहे. यावेळी अध्यक्ष कोण असणार याबद्दल सुरुवातीला असलेली उत्सुकता शमली आहे.

Ajit Pawar political offer to join NCP and BJP take Precaution in pune | अजित पवारांची ‘पॉलिटिकल ऑफर’; दगाफटका होऊ नये यासाठी भाजपा सतर्क

अजित पवारांची ‘पॉलिटिकल ऑफर’; दगाफटका होऊ नये यासाठी भाजपा सतर्क

googlenewsNext

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असलेल्यांना वाजत पक्षात घेणार असल्याचे वक्तव्य केले. पवार यांच्या भूमिकेमुळे सत्ताधारी भाजपाच्या गोटात मात्र पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी १९ नगरसेवकांवर ‘वॉच’ ठेवत असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यातच महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांसह महत्त्वाच्या पदांवरील पदाधिकारी न बदलण्याच्या पक्षाच्या निर्णयामुळे काही ज्येष्ठ नगरसेवक नाराज आहेत. त्यामुळे येत्या पालिका निवडणुकीत दगाफटका होऊ नये याकरिता भाजपा अधिक सतर्क झाली आहे.

स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड लवकरच केली जाणार आहे. यावेळी अध्यक्ष कोण असणार याबद्दल सुरुवातीला असलेली उत्सुकता शमली आहे. कारण विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांनाच मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. सभागृह नेते बदलानंतर महापौर बदलाची चर्चा सुरु झाली होती. महापौरपदावर नवा चेहरा हवा, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली होती. परंतु, महापौरही बदलणार नसल्याचे पक्षाकडून स्पष्ट केले.

पालिकेत सत्ताबदल झाल्यानंतर मुक्ता टिळक, मुरलीधर मोहोळ, सुनील कांबळे, योगेश मुळीक, हेमंत रासने, श्रीनाथ भिमाले, धीरज घाटे यांना प्रमुख पदांवर संधी मिळाली. नव्या चेहऱ्यांना संधी मिळणे गरजेचे असल्याचे मत काही नगरसेवक खासगीत व्यक्त करीत आहेत. यंदा काही उपनगरांसह सिंहगड रस्ता परिसराला प्रतिनिधित्व मिळेल अशी अटकळ बांधली जात होती. त्यादृष्टीने श्रीकांत जगताप, राजाभाऊ लायगुडे, शंकर पवार यांनी तयारी चालविली होती. सातारा रस्त्यावरील धनकवडीतील नगरसेविका वर्षा तापकीर, राजेंद्र शिळीमकर हे स्थायी समिती अध्यक्षपदाच्या ‘रेस’मध्ये होते. परंतु, त्यांचीही संधी हुकल्याचे बोलले जात आहे.

‘आयारामां’ना पुन्हा परतीचे वेध

गेल्या काही दिवसांत भाजपातील ‘आयारामां’ना पुन्हा परतीचे वेध लागले आहेत. अजित पवार यांनी निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना पक्षात घेण्याचे केलेले वक्तव्य पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचे मानले जात आहे. ठराविक नगरसेवकांना संधी मिळत असल्याने नाराज नगरसेवकांना ‘गळाला’ लावण्याचे प्रयत्न विरोधी पक्षांकडून केले जातीलच. भाजपाला नागपूर पालिकेत असाच फटका बसला असून त्याची पुनरावृत्ती टाळण्याचे आव्हान आहे.

ताकद देण्याकडे मात्र दुर्लक्ष

नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांमधे राष्ट्रवादीचे प्राबल्य असून पालिका निवडणुकांमध्ये भाजपाच्या उपनगरातील नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या नगरसेवकांना ताकद देण्याची गरज असताना त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.

Web Title: Ajit Pawar political offer to join NCP and BJP take Precaution in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.