- राजेश भोजेकरचंद्रपूर लोकसभा मतदार संघात विद्यमान केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हेच भाजपचे उमेदवार राहतील, हे जवळपास निश्चित आहे. त्यांना तगडे आव्हान देण्याची क्षमता काँग्रेसमध्येच आहे. मात्र काँग्रेस अद्याप दमदार उमेदवाराच्या शोधातच असून, हा चेहरा कोण असेल, याकडे भाजपासह सर्वच राजकीय पक्ष बारीक लक्ष ठेवून आहे. काँग्रेस उमेदवार पुढे येताच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.चंद्रपूरमधील चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, वरोरा व यवतमाळमधील वणी व आर्णी विधानसभा क्षेत्र मिळून या लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आहे. या मतदारसंघात भाजपाचे पाच, तर शिवसनेचा एक आमदार आहे. शिवाय चंद्रपूर जिल्हा परिषद, चंद्रपूर महापालिका आणि निम्म्या नगर परिषदा व त्याहीपेक्षा अधिक पंचायत समित्या भाजपाच्या ताब्यात आहेत. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात विकासाचा धडाका लावला आहे, तर खासदार या नात्याने हंसराज अहीर यांनी सुरुवातीपासूनच दांडगा जनसंपर्क ठेवला आहे. मात्र ते गेली १५ वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व करीत असल्याने ‘अॅन्टीइन्कम्बंसी’ची भीती भाजपाला आहे.हा फॅक्टर ‘कॅश’ करण्यासाठी काँग्रेसलाही तोडीचा उमेदवार द्यावा लागेल. जनआक्रोश मोर्चा व जनसंघर्ष यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत चैतन्याचे वातावरण आहे. शिवाय, तीन राज्यांत झालेल्या भाजपाच्या पराभवामुळे लोकसभा निवडणुकीत यश येईल, असा आशावाद काँग्रेस नेते बाळगून आहेत. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, माजी आमदार वामनराव कासावार, बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी जि. प. अध्यक्ष प्रकाशपाटील मारकवार, आसावरी देवतळे, विनायक बांगडे, सुनिता लोढीया, शिवा राव, असे डझनभर काँग्रेस नेते तिकिटावर नजर खिळवून आहेत. आ. विजय वडेट्टीवार हे दमदार उमेदवार होऊ शकतात. परंतु पक्षाने तिकीट दिल्यास लढू, या भूमिकेत ते आहेत. माजी आमदार सुभाष धोटे लढण्यासाठी इच्छुक नाहीत.काँग्रेसने माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांना उमेदवारीची ‘आॅफर’ दिली; पण त्यांनी ही निवडणूक न लढण्याचा निश्चय केला. माजी खासदार नरेश पुगलिया यांचेही तिकिटासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. अशात काँग्रेस हायकमांडने जिल्ह्याची धुरा माजी आमदार सुभाष धोटे यांच्यावर सोपविताच नवे समीकरण पुढे येत आहे. या कुणबीबहुल मतदारसंघात मराठी चेहरा उतरविण्याचे संकेत काँग्रेसकडून मिळत असून, पाऊणकर व कासावर ही नावे आघाडीवर आहेत. ऐनवेळी सुभाष धोटे यांचे नावही पुढे येऊ शकते. काँग्रेसचा नेमका चेहरा पुढे आल्यावरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.मतदारसंघ :चंद्रपूरएकूण मतदार- 17,52,615पुरुष मतदार- 9,20,276महिला मतदार- 8,32,339सध्याची परिस्थिती२०१४ च्या लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार संजय देवतळे यांना विधानसभेची तिकीट काँग्रेसने नाकारताच त्यांनी भाजपकडून निवडणूक लढली व हरले. आता ते भाजपातच आहेत.गेल्या निवडणुकीत आपकडून लढून दोन लाख मते घेणारे अॅड. वामनराव चटप यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. ही बाब काँग्रेससाठी दिलासादायक आहे.युती न झाल्यास शिवसेना स्वबळावर लढेल. वरोराचे आमदार बाळू धानोरकर यांच्याकडे सेनेचे उमेदवार म्हणून बघितले जात आहे. ही बाब भाजपासाठी डोकेदुखीची असेल.भारिप-बहुजन महासंघ व एमआयएमची वंचित बहुजन आघाडी भाजपाविरोधात दंड थोपटून उभी असली तरी निवडणुकीत ती काँग्रेसची अडचण वाढवणारी ठरू शकेल.२०१४ मध्ये मिळालेली मतेहंसराज अहिर (भाजपा)- 5,08,049संजय देवतळे (काँग्रेस)- 2,71,780अॅड. वामनराव चटप (आप)- 2,04,413हंसराज कुंभारे (बसपा)- 49,229प्रमोद सोरते (अपक्ष)- 10,930
चंद्रपूरात काँग्रेस उमेदवाराकडेच सर्वांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 3:55 AM