राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. "मी माझ्या जवळीस सर्व पुरावे एका बंद लिफाफ्यात केंद्रीय गृहसचिवांना दिले आहेत आणि या प्रकरणासंदर्भात माझ्याकडे असलेली सर्व माहिती मी त्यांना सांगितली आहे. त्यासोबतच याची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे", अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांना दिली. (All the evidence was given to the Home Secretary in a sealed envelope, says Devendra Fadnavis)
महाराष्ट्रात पोलिसांच्या बदल्यांचं रॅकेट सुरू असून यासंदर्भातील कॉल रेकॉर्डिंग आणि इतर सबळ पुराव्यांसकट एक अहवाल तत्कालीन गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी राज्य सरकारला दिला होता. पण त्यावर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळेच हे सारे पुरावे आता केंद्रीय गृहसचिवांना दिले आहेत, असं फडणवीस म्हणाले.
गृहसचिवांनी दिलं कारवाईचं आश्वासन"केंद्रीय गृहसचिवांनी माझं सर्व बोलणं ऐकून घेतलं आणि सर्व पुराव्यांची पडताळणीकरुन लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं आहे", असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
राज्य सरकार कुणाला वाचवतंय?पोलिसांच्या बदली संदर्भातील रॅकेट चालवलं जात असल्याचा अहवाल २५ ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडे देण्यात आलेला असतानाही त्यावर अद्याप कोणतीच कारवाई सरकारनं का केली नाही? त्या अहवालावर काहीच कारवाई न करता सरकार नेमकं कुणाला वाचवू पाहायतंय?, असा सवाल फडणीस यांनी यावेळी उपस्थित केला.