नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांची अधिकृत घोषणा बाकी असली तरी राजकीय पक्षांनी त्यासाठी तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, मायावती, चंद्राबाबू नायडू आदी नेत्यांनी जोरदार तयारी सुरूही केली आहे, पण भाजपाने आतापासूनच बहुतांशी खासगी विमाने व हेलिकॉप्टर्स बुक केली, त्यामुळे अन्य पक्षांची आताच अडचण झाली आहे. भाजपाने नेमकी किती खासगी विमाने व हेलिकॉप्टर्स बुक केली, हे स्पष्ट झाले नसले तरी आपले सर्व मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांच्या दिमतीला एक विमान वा हेलिकॉप्टर असेल, याची व्यवस्था केल्याचे समजते.शिवाय बहुतांशी केंद्रीय मंत्र्यांसाठी खासगी विमानाची आताच व्यवस्था करून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री व प्रदेशाध्यक्ष यांच्याखेरीज काही स्टार प्रचारकांसाठीही विमाने व हेलिकॉप्टर्स बुक करण्यात आल्याचे समजते. या सर्व विमाने व हेलिकॉप्टर्स यांचे भाडे किती होईल, हे सांगता येत नाही. मात्र हा खर्च पक्ष करीत असल्याने उमेदवारावर त्याचा भार पडणार नाही. त्यामुळे त्याच्या खर्चात तो दाखविलाही जाणार नाही. तरीही हा खर्च काही कोटी रुपयांमध्ये जाईल, असे म्हटले जाते. केंद्रात व राज्यांत सत्ताधारी असलेल्या पक्षांना अशी व्यवस्था करण्यात अडचण येत नाही, निधीची ददात नसते व अनेक व्यावसायिक, उद्योजक आपली विमानेही द्यायला तयार असतात.भाजपाने आधीच विमाने व हेलिकॉप्टर्स बुक केल्यामुळे काँग्रेसला आपल्या नेत्यांसाठी ती कोठून मिळवायची, हा प्रश्न पडला आहे, असे काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते व पक्षाच्या प्रसिद्धी समितीचे प्रमुख आनंद शर्मा यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाने सरकारच्या तिजोरीतून स्वत:च्या प्रसिद्धीवर ४ हजार कोटी रुपये खर्च केले असून, ही रक्कम अमॅझॉन, युनिलिव्हर, नेटफ्लिक्स या बड्या कंपन्यांच्या वार्षिक खर्चापेक्षाही अधिक आहे.>तरीही भाजपाला पराभूत करूआनंद शर्मा म्हणाले की, खर्चाच्या बाबतीत आम्ही भाजपाशी स्पर्धा करूच शकत नाही. भाजपाने विमाने व हेलिकॉप्टर्स बुक करून ठेवल्याने आमच्या नेत्यांना अडचणी येतील, हे गृहीत धरूनच काँग्रेसने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबण्याचे ठरवले आहे. आम्ही आमचे प्रचाराचे काम फेब्रुवारीमध्ये सुरू करणार आहोत. मात्र, सोशल मीडिया व आमचे कार्यकर्ते यांनी आताच कामाला सुरुवात केली आहे. पैसा व यंत्रणा नसली तरी लोकसभा निवडणुकांमध्ये आम्ही निश्चितच भाजपाला पराभूत करू.
प्रचारार्थ सारी विमाने, हेलिकॉप्टर्स भाजपाकडून बुक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 5:47 AM