मुंबई - भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील सत्ता हातात घेऊन एक वर्षाचा अवधी उलटून गेला आहे. वर्षभराच्या कारभारानंतर आता महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या कारणावरून खटके उडत आहेत. त्यातच आता मुंबई प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस विश्वबंधू राय यांनी पक्षाच्या हायकमांड यांना लिहिलेल्या पत्रामुळे महाविकास आघाडीत वादाची अजून एक ठिणगी पडण्याची शक्यता आहे.शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे काँग्रेसची प्रतिमा मलिन होत असल्याचे विश्वबंधू राय यांनी या पत्रात म्हटले आहे. तसेच पक्षश्रेष्ठींनी वेळीच याबाबत कठोर निर्णय घेतला पाहिजे, अशी विनंती त्यांनी केली आहे. त्याबरोबरच महाविकास आघाडीमध्ये विश्वास आणि सामंजस्याचा अभाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना लिहिलेल्या पत्रात विश्वबंधू राज म्हणतात की, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांची उपेक्षा होत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमुळे काँग्रेस आणि जनतेचे नुकसान होत आहे. त्यामुळे या सरकारमध्ये कायम राहण्याचे कुठलेही औचित्य दिसत नाही. ही आघाडी काँग्रेससाठी नुकसानकारक दिसत आहे.येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा मित्रपक्षांच्या चुकांचा फटका बसू शकतो. अशा परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि त्याच्या कार्यकर्त्यांचे भविष्य पाहून पक्षश्रेष्ठींनी कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे विश्वबंधू राय यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.महाराष्ट्र सरकारमध्ये घटक पक्ष असलेल्या नेत्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे नाव वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये समोर येत आहे. अनेक तपास यंत्रणा आरोपांची चौकशी करत आहेत. अशा परिस्थितीत या आघाडीचा घटक असलेल्या काँग्रेसची प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये खराब होत आहे. त्याचा मतदारांवर चुकीचा प्रभाव पडत आहे.
काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडना लिहिलेले पत्र