काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येतील का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. यादरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राऊत यांनी भाजपसोबत शिवसेनेच्या असलेल्या नात्याची तुलना अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्या नात्याशी केली आहे. नुकतंच त्या दोघांनी विभक्त होण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजप हे काही शत्रू नाहीत असं वक्तव्य केलं होतं.
"आम्ही भारत पाकिस्तान नाही. आमिर खान आणि किरण राव यांना पाहा, हे अशाप्रकारचं नातं आहे. आमचे (शिवसेना-भाजप) राजकीय मार्ग निरनिराळे आहेत, परंतु आमची मैत्री कायम राहिल," असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेनं पुन्हा हात दिला, तर त्यांना सोबत घेणार का, असा सवाल फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर राजकारणात जर-तर असं काही नसतं, असं फडणवीस म्हणाले. राजकारणात जे जर-तर वर राहतात, ते केवळ स्वप्नच पाहतात, राजकारणात परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात, असं अतिशय सूचक विधान त्यांनी केलं होतं.