लाल मिरची हवन, ७ बकऱ्यांचा बळी; भाजपा खासदाराच्या यज्ञामुळे काँग्रेस आमदाराला मृत्यूचं भय
By प्रविण मरगळे | Published: February 3, 2021 09:19 AM2021-02-03T09:19:40+5:302021-02-03T09:22:03+5:30
राज्यसभेतील भाजपाचा एक खासदार माझ्या मृत्यूसाठी यज्ञ करत आहे
रायपूर – राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना अनेकदा पाहिलं आहे. काँग्रेस आणि भाजपा नेत्यांमध्ये बऱ्याचदा शाब्दिक युद्धही रंगलं आहे. पण छत्तीसगडमध्ये सध्या सुरु असलेल्या एका चर्चेने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. काँग्रेसचे आमदार बृहस्पती सिंह यांना मंत्री न बनवता त्यांना एका विकास प्राधिकरणावर उपसंचालक म्हणून नेमण्यात आलं आहे.
बृहस्पती सिंह काही दिवसांपासून नाराज आहेत, त्यांनी असा आरोप केला आहे की, राज्यसभेतील भाजपाचा एक खासदार माझ्या मृत्यूसाठी यज्ञ करत आहे, लाल मिरचीपासून गेल्या २ दिवसापासून हवन सुरू आहे. ७ बकऱ्यांचा बळीही दिला आहे. तर भाजपा खासदारांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. यज्ञ धार्मिक विधी असतो, यज्ञ करणं चुकीचं नाही, पण आम्ही बृहस्पती सिंह यांच्या मृत्युसाठी कोणताही यज्ञ केला नाही असं स्पष्टीकरण भाजपा खासदाराने दिलं आहे.
मात्र भाजपा खासदाराच्या या स्पष्टीकरणानंतरही त्याचा काही परिणाम झाला नाही, तर काँग्रेस आमदार या मुद्द्यावरून पक्षाला स्वत:सोबत उभं राहण्यासाठी एकत्र करत आहे, यानंतर काँग्रेसमधील इतर नेत्यांनीही आमच्या आमदाराच्या मृत्युसाठी कोणी यज्ञ कसं काय करू शकतं? असा सवाल उपस्थित केला आहे. इतकचं नाही तर आमदारांच्या दिर्घ आयुष्यासाठी त्यांच्या मतदारसंघात विविध ठिकाणी कार्यकर्त्याकडून यज्ञ करण्याचं आयोजन केले जात आहे.
यावरून भाजपा नेत्यांनी काँग्रेस आमदारावर निशाणा साधला आहे. आमदार स्वत:च्या मतदारसंघात रस्ते बनवू शकले नाही पण यज्ञ करण्यासाठी तयारी करत आहेत. त्यामुळे सध्या छत्तीसगडच्या राजकारणात यज्ञाची ही राजकीय लढाई कधीपर्यंत सुरु राहील आणि याचा कोणाला फायदा होईल हे आगामी काळात दिसून येणार आहे.