'अमर, अकबर, अँथनी'ने 'रॉबर्ट सेठ'चा पराभव केला'; काँग्रेसचा भाजपला टोला
By मोरेश्वर येरम | Published: December 4, 2020 04:01 PM2020-12-04T16:01:40+5:302020-12-04T16:08:11+5:30
भाजपच्या पराभवावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार टीका केली आहे.
मुंबई
राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीने यश मिळवलं. तर भाजपला सपाटून मार खावा लागला आहे. भाजपच्या या पराभवावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार टीका केली आहे. "अमर, अकबर, अँथनीने 'रॉबर्ट सेठ'चा आज पराभव केला", असा उपरोधिक टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे.
सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर एक व्हिडिओ ट्विट केलाय. त्यात ते म्हणतात की, "भारतीय जनता पक्ष नेहमी महाविकास आघाडी सरकारला अमर, अकबर, अँथनींचं सरकार असं म्हणत होतं. अमर, अकबर, अँथनी जरा हिट चित्रपट होता. त्याचपद्धतीने महाविकास आघाडीचं कॉम्बिनेशन आता हिट झालं आहे आणि अमर, अकबर, अँथनीने 'रॉबर्ट सेठ'चा पराभव केलाय एवढं मात्र निश्चित आहे"
आणि रॉबर्ट सेठचा दणदणीत पराभव झाला..... pic.twitter.com/JVBAgCLfUs
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 4, 2020
पदवीधरच्या निवडणुकीत ६ पैकी ४ जागांवर महाविकास आघाडीला यश मिळालं आहे. तर भाजपला मतदारांनी सपशेल नाकारलं आहे. भाजपने याआधी सर्व जागांवर यश मिळेल असा दावा केला होता. त्यावरही सचिन सावंत यांनी निशाणा साधला आहे. "देशहितासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं या कारणासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले होते. आज त्या एकोप्याचं फळ आघाडीला मिळालं आहे. भाजपच्या १०५ जागांच्या १५० जागा होतील अशा वल्गना फडणवीस करत होते. तो भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे. गेली ५५ वर्ष नागपुरात भाजपचा गड होता. तो गड त्यांना राखता आला नाही", असं सावंत म्हणाले.