Punjab Politics: सिद्धूंना रोखण्यासाठी अमरिंदर सिंगांची मोठी खेळी; कट्टर विरोधकाशीच केली हातमिळवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 10:58 PM2021-07-17T22:58:54+5:302021-07-17T22:59:38+5:30
Navjyot singh Sidhu Punjab congress: पंजाबचे प्रभारी रावत यांनी सिद्धू यांना अध्यक्ष पद देण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. यावर अमरिंदर सिंग यांनी नाराजी व्यक्त करताच रावत यांनी लगेचच यु टर्न घेतला होता. मात्र, शुक्रवारी सिद्धू यांनी सोनिया गांधींची भेट घेतल्याने सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याची जोरदार चर्चा होत आहे. आज सिद्धू यांच्या चेहऱ्यावरही आनंद ओसंडून वाहत होता.
काँग्रेसशासित राज्य पंजाबमध्ये (Punjab Politics) धुमसत असलेली आग शमण्याची चिन्हे असताना त्यात मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी पुन्हा तेल ओतण्याचे काम केले आहे. आज नवज्योत सिंग सिद्धू यांना काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष घोषित करण्यात येणार होते. परंतू अमरिंदर यांनी सिध्दू (Navjyot singh sidhu) यांना रोखण्यासाठी कट्टर विरोधक प्रताप सिंह बाजवा यांच्याशी हातमिळवणी करत मोठी खेळी खेळली आहे. यामुळे सिद्धू यांची निवड आणखी काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. (Amarinder Singh meet Pratap singh Bajwa to stop Navjyot singh siddhu.)
आज बाजवा यांना कॅप्टननी निवासस्थानी बोलावले होते. त्यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष आणि जुने काँग्रेसी राणा केपी सिंग हे देखील होते. पंजाबचे प्रभारी रावत यांनी सिद्धू यांना अध्यक्ष पद देण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. यावर अमरिंदर सिंग यांनी नाराजी व्यक्त करताच रावत यांनी लगेचच यु टर्न घेतला होता. मात्र, शुक्रवारी सिद्धू यांनी सोनिया गांधींची भेट घेतल्याने सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याची जोरदार चर्चा होत आहे. आज सिद्धू यांच्या चेहऱ्यावरही आनंद ओसंडून वाहत होता.
या साऱ्या घडामोडींवर कसलेल्या कॅप्टननी मोठा डाव खेळला आहे. सिद्धू यांना रोखण्यासाठी मोर्चेबांधणी करताना त्यांनी कट्टर विरोधक प्रताप सिंह बाजवा यांनाच घरी निमंत्रण देत गुफ्तगू करत पक्षनेतृत्वाला मोठा संदेश दिला आहे. त्या आधी त्यांनी सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये जबरदस्तीने राज्याच्या राजकारणात हस्तक्षेप केल्याने परिस्थिती बिघडू शकते असा इशारा दिला आहे. तसेच बाजवा यांच्याशी हातमिळविणी करत प्रदेशाध्यक्ष पद कोणत्यातरी ज्येष्ठ नेत्याला देण्यात यावे असा संदेश दिला आहे.
सिद्धू यांनी काही वर्षांपूर्वीच भाजपा सोडली आहे. यामुळे पक्षातील एकनिष्ठांना डावलून त्यांना प्रदेशाध्यक्ष पद देणे कॅप्टनना पटलेले नाही. रावत यांच्या ट्विटनंतर कॅप्टननी सोनिया गांधींचा आदेश मान्य असल्याचे म्हटले आहे, परंतू जोवर सिद्धू आपली माफी मागत नाहीत, तोवर त्यांची भेट घेणार नसल्याची भूमिका कॅप्टननी घेतल्याने पुन्हा नवा पेच फसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास सिद्धू यांना आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. सिद्धू यांनी आमदारांच्या भेटीगाठीला सुरुवात केली आहे.