मुंबई : विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवून राज्यकारभार सुरू आहे. मागील काही वर्षांत दलित, अल्पसंख्याकांवर अत्याचार वाढले आहेत. प्रसार माध्यमांनाही बोलण्याची मोकळीक नाही. सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग अशा सर्व स्वायत्त संस्थांचा दुरुपयोग वाढला आहे. सरकारच्या विरोधात बोलले की, चौकशी लावली जाते. आंदोलन केले तर बदनाम केले जाते. आता लोकशाही व संविधान रक्षणाची जबाबदारी आपल्यावर आली आहे. ‘अनियंत्रित लोकशाही हुकूमशाहीला जन्म देते,’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्द आज खरे ठरत आहेत, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई विभागीय काँग्रेसच्या वतीने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी व्हर्च्युअल सभेचे आयोजन केले होते. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन सभा झाली. राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक प्रमुख पाहुणे होते तर विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आदी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
एच. के. पाटील म्हणाले, समाजातील शोषित घटकांच्या कल्याणासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी काम केले. त्यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे. परंतु रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत संविधानाचे रक्षण आपण करू, असा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला. नाना पटोले म्हणाले, केंद्रातील सरकार हे देशातील मूठभर लोकांसाठीच आर्थिक धोरणे राबवत आहे. फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसाच देशाला तारणारा असून हा विचार राज्यात यापुढेही रुजवू आणि देशाला तोडू पाहणारा विचार नष्ट करण्याचे काम करू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान संपुष्टात आणू पाहणाऱ्या भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ते काम करू देणार नाही.
रक्तदानास सुरुवातव्हर्च्युअल सभेच्या आधी राज्यव्यापी रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा, तालुका, ब्लॉक स्तरावर हा ‘रक्तदान सप्ताह’ सुरू राहणार आहे. मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातही हे रक्तदान शिबिर होत आहे. राज्यभरात २ लाख रक्त पिशव्या संकलित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. संकलित रक्त शासनाच्या रक्तपेढ्यांना दिले जाणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांनी केले. तत्पूर्वी सकाळी चैत्यभूमीला जाऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.