कोलकातापश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजपने) कंबर कसली आहे. निवडणुकीसाठी भाजपकडून संपूर्ण ताकद, यंत्रणा पणाला लावली जात आहे. तर भाजपच्या काही चेहऱ्यांनी या निवडणुकीसाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही प.बंगालकडे आपला मोर्चा वळवला आहे. नव्या वर्षापासून अमित शहा प्रत्येक महिन्यातील एक आठवडा प.बंगालमध्ये ठाण मांडून असणार आहेत. यात शहा निवडणुकीचा घटनाक्रम, प्रचार, रणनितीवर स्वत: जातीनं लक्ष देणार आहेत.
प.बंगालमध्ये पुढील वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ २६ मे २०२१ रोजी संपुष्टात येणार आहे. त्याआधी निवडणूक आयोगाला निवडणुकीचा कार्यक्रम घ्यावा लागणार आहे.
भाजपनं प.बंगालच्या निवडणुकीसाठीचं रणशिंग याआधीच फुंकलं आहे. भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी प.बंगालचा दोन दिवसांचा दौरा केला होता. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बंगालचा दौरा करत आहेत. या दौऱ्यात शहा जनसंपर्क अभियानावर जास्त भर देत आहेत.
नव्या वर्षात प.बंगालमधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. अमित शहा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यांमध्ये प्रत्येकी एक आठवडा प.बंगालच्या दौऱ्यावर असणार आहेत. प्रत्येक महिन्यात किमान ३ ते ७ दिवस शहा पश्चिम बंगालमध्ये असतील.
निवडणूक होईपर्यंत अमित शहा प.बंगालमध्ये प्रत्येक महिन्याला दौरा करणार आहेत. यावेळी ते दोन दिवसांसाठी आले आहेत. पण येत्या काळात प्रत्येक महिन्यात किमान ७ दिवस शहा प.बंगालमध्ये असतील, असं प.बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी सांगितलं.
अमित शहा यांच्यासोबतच भाजपच्या इतर महत्वाच्या नेत्यांनीही प.बंगालमध्ये ठाण मांडण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य दोन दिवसांच्या प.बंगालच्या दौऱ्यावर आहेत. यात ते ३० विधानसभा मतदार संघांमध्ये प्रचाराचं काम करणार आहेत.
दरम्यान, अमित शहा यांनी शनिवारी रात्री कोलकातामध्ये पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. बैठकीत पक्षानं प.बंगालमध्ये केलेल्या कामांवर सविस्तर चर्चा झाल्याचं दिलीप घोष यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमधील विविध ठिकाणी भाजपचे नेते प्रचाराचं काम करत आहेत. याबाबत सविस्तर माहिती शहा यांनी जाणून घेतली, असंही घोष यांनी सांगितलं.