सिंधुदुर्ग - केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी काल केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यामुळे कोकणात शिवसेना विरुद्ध भाजपा वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. अमित शाहा यांनी शिवसेनेवर टीका करत नारायण राणे यांना बळ आणि योग्य सन्मान देण्याचे सूचक विधान केल्यानंतर आता शिवसेना नेते आक्रमक झाले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंना पराभवाचा धक्का देत सिंधुदुर्गमधील कुडाळ-मालवण मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवणाऱ्या वैभव नाईक यांनी आता नारायण राणे आणि भाजपाला जोरदार आव्हान दिले आहे.अमित शाहा यांनी नारायण राणेंना कितीही बळ पुरवले तरी ते शिवसेनेला घाबरून मैदान सोडून पळ काढणार नाहीत, याची खातरजमा अमित शाहा यांनी करून घ्यावी असा टोला वैभव नाईक यांनी लगावला आहे. तसेच राणेंना कितीही ताकद दिली तरी पुढच्या निवडणुकीत शिवसेना त्यांना पुन्हा एकदा पराभूत करून भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे.काल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंचा उल्लेख महाराष्ट्राचे दबंग नेते असा केला होता. मात्र या दबंग नेत्याला पक्षात प्रवेश देण्यासाठी वर्षभर का ताटकळत का ठेवले, असा सवाल वैभव नाईक यांनी फडणवीस आणि भाजपाला विचारला आहे.
"नारायण राणे मैदान सोडून पळणार नाहीत याची अमित शाहांनी खातरजमा करून घ्यावी"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 4:08 PM