Amit Shah Rahul Gandhi Reservation : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबद्दल केलेल्या विधानावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हल्ला चढवला. हरियाणातील रेवारी येथे झालेल्या प्रचारसभेत बोलताना शाह यांनी राहुल गांधींच्या विदेशातील दौऱ्यांवरही टीका केली.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसला दोन मुद्द्यावरून घेरण्याचे प्रयत्न केला जात आहे. राहुल गांधींनी आरक्षणाबद्दल मांडलेली भूमिका आणि कुमारी शैलजा यांच्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा हरियाणात प्रचाराच्या केंद्रस्थानी आला आहे.
अमित शाह राहुल गांधींना काय म्हणाले?
रेवारी येथील प्रचारसभेत बोलताना अमित शाह म्हणाले, "अलिकडेच राहुल बाबा विदेशात गेले होते. जेव्हा केव्हा उलटं सुलटं बोलायचं असतं, तेव्हा परदेशात जाऊन बोलतात. त्यांना वाटतं तिथे बोललो, तर इथे कुणी ऐकणार नाही. आता म्हणाले की, 'आम्ही एससी, एसटी, ओबीसी आणि मागास वर्गाचं आरक्षण बंद करू."
"हे आमच्यावर आरोप करत होते की, आम्ही (भाजपा) आरक्षण संपवणार आहोत आणि तिथे अमेरिकेत जाऊन इंग्रजीमध्ये बोलून आले की, आम्ही (काँग्रेस) आरक्षण बंद करू. राहुल बाबा, कसे करणार? सरकार आमचं आहे", अशा शब्दात अमित शाहांनी राहुल गांधींवर पलटवार केला.
आयुष्यभर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला -शाह
अमित शाह पुढे म्हणाले की,"मी सांगू इच्छितो की, जोपर्यंत संसदेत एक जरी भाजपाचा खासदार असेल, तोपर्यंत मागास वर्गाचे आरक्षण तुम्ही बंद करू शकणार नाही. जोपर्यंत एक जरी खासदार असेल, तोपर्यंत आमच्या दलित बांधवांचे आरक्षण बंद करू शकत नाही. आयुष्यभर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. त्यांना भारतरत्न मिळू दिला नाही. त्यांचे कुठलेही स्मारक बनले नाही. बाबासाहेबांची पाच स्मारके बनवण्याचे काम भाजपाने केले", असं टीकास्त्र शाह यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर डागले.