“उद्धव ठाकरेंचे नेतृत्व सुसंस्कृत-संयमी; पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यास आनंदच होईल, पण...”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 11:24 AM2021-07-29T11:24:14+5:302021-07-29T11:25:43+5:30
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय नेतृत्व करावे, असे म्हटले होते. यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच स्तरातून भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय नेतृत्व करावे, असे म्हटले होते. तर शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनीही उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी सदिच्छा व्यक्त केली होती. यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यबाबत आशावादी असायला काहीच हरकत नाही, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. (amol kolhe react over uddhav thackeray to become prime minister)
दक्षिण आणि उत्तरेतील राज्यांतील जनतेला आपलेसे वाटू शकेल असे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांचे असल्याने, ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे तमाम मराठी जनतेचे स्वप्न साकार करावे. त्यांनी भविष्यात पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी सदिच्छा राहुल शेवाळे यांनी व्यक्त केली होती. तसेच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व करावे, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या होत्या. यावर आता शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर खासदार झालेल्या अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मोदी सरकार देतेय १५ लाख कमावण्याची संधी; घरबसल्या करावं लागेल केवळ ‘हे’ काम
अभिमानच असेल, आनंदच होईल
संजय राऊत यांनी जे वक्तव्य केले त्याबद्दल आशावादी असायला काहीच हरकत नाही. कोणतीही मराठी व्यक्ती पंतप्रधानपदी बसली, तर प्रत्येक मराठी माणसाला त्याचा अभिमानच असेल, आनंदच होईल, असे सांगत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मला कायम सुसंस्कृतपणा आणि संयमीपणा दिसला आहे, असे अमोल कोल्हे यांनी नमूद केले.
आता लसींचे दर वाढले; कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे नवे दर जाणून घ्या
विरोधी पक्षाने एकत्र येणे हे आशादायी चित्र
संजय राऊत यांनी जो आशावाद व्यक्त केला, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. परंतु, सगळ्या विरोधी पक्षांची भूमिका आणि राष्ट्रवादीसह पक्षेश्रष्ठींची भूमिका काय असेल, हे माहिती नाही. मात्र, तीही महत्त्वाची असेल, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. देशाच्या दृष्टीने विरोधकांचा चेहरा कोण हा मुद्दा गौण ठरत असून, सरकारच्या एक कलमी कार्यक्रमाला चाप बसवणे गरजेचे आहे. त्यामुळे या परिस्थितीत विरोधी पक्षाने एकत्र येणे हे आशादायी चित्र आहे, असे कोल्हे यांनी सांगितले.
“कोरोना संकटकाळात भारताने केलेली मदत कधीही विसरणार नाही”: अमेरिका
दरम्यान, पेगॅसेस, कोरोनाची तिसरी लाट, प्रचंड वाढलेली महागाई, कृषी कायदे या विषयांवर संसदेत चर्चा झाली पाहिजे. सरकार म्हणत असेल की, सभागृहात काम रेटून नेऊ पण आमचा याला जोरदार विरोध असेल, असे कोल्हे म्हणाले.