पुणे :शिवसेनेतून राष्ट्रवादीतून आलेले आणि नुकतेच शिरूर लोकसभेचे तिकीट जाहीर झालेल्या डॉ अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच बंडाळीला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भागातल्या एक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने 'अमोल कोल्हे यांना पाडणार' अशा अर्थाची बॅनरबाजी केल्याने राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे.
२०१४साली शिरूरमधून माजी आमदार विलास लांडे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात अपयश आले होते. यावेळीही त्यांना उमेदवारी मिळावी याकरिता त्यांचे कार्यकर्ते आग्रही होते. यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी अजित पवारांसमोर घोषणाबाजी केली होती. दुसरीकडे कोल्हे यांना अपॆक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर झाली आहे. तीन वेळा प्रयत्न करूनही धोका दिलेली शिरूरची जागा काहीही करून मिळवायची असा चंग राष्ट्रवादीने बांधला असताना मात्र कोल्हे यांना कार्यकर्त्यांच्या विरोधाचा सामना करावा लागतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
सागर डुंबरे नावाच्या या बॅनरमध्ये लिहिताना ''अमोल कोल्हे राष्ट्रवादीतून लढणार असतील तर त्यांना आम्ही आमची ताकद दाखवणार, अडचणीच्या काळात राष्ट्रवादीला साथ देणाऱ्या लांडे यांना उमेदवारी न दिल्याने कोल्हे यांना पाडण्याची भाषाही या बॅनरमध्ये केली आहे''. निवडणूक तोंडावर आलेली असताना कार्यकर्त्यांची नाराजी कोल्हे यांना परवडण्यासारखी नाही. त्यामुळे आता यावर कोल्हे आणि राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया होते हेच बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.