मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने सत्ताधारी एनडीएविरोधात आक्रमक पवित्रा घेत उमेदवार उभे केले होते. पहिल्यांदा बिहारमध्ये शिवसेना 50 जागांवर लढणार असल्याचं जाहीर केले. परंतु शिवसेनेने 22 जागांवर उमेदवार उभे केले होते, मात्र यातील सर्व 22 जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झालं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यावरून शिवसेनेला टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओमध्ये बिहारमधील निवडणुकीतील कामगिरीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. "महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस- राष्ट्रवादीने युती केल्याचा परिणाम बिहार निवडणुकीवर झाला आहे. काँग्रेस महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर गेल्यानं काँग्रेसने बिहारमध्ये व्होट बँक कमी केली. तर राष्ट्रवादीच्या आधी काही ठिकाणी जागा तरी येत होत्या आता तर ते ही झालं नाही" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. अमृता यांनी शिवसेनेवर टीका करताना शिवसेनेचा उल्लेख "शवसेना" असा केला आहे. "'शिवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारलं बिहारमध्ये, काय चाललंय तरी काय? महाराष्ट्र कुठे ही नेला असो बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबाबत धन्यवाद" असं ट्विट केलं आहे. अमृता फडणवीस यांनी बिहारमधील मतदारांचे आभार मानले आहेत.
"शिवसेनेची संजय राऊतांमुळे महाराष्ट्रातही अशीच अवस्था होईल", निलेश राणेंचा हल्लाबोल
भाजपाने नेते निलेश राणे यांनी देखील शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच संजय राऊतांवरही टीकास्त्र सोडलं आहे. निलेश राणे यांनी सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होणाऱ्या शिवसेनेला मिळालेल्या मतांच्या यादीचा मजकूर पोस्ट केला आहे. यासोबतच "वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन" असं म्हटलं आहे. बिहारमध्ये शिवसेनेची परिस्थिती जशी झाली आहे तशीच परिस्थिती महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यामुळे होईल असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे. "संजय राऊत जोपर्यंत शिवसेनेत आहे तोपर्यंत विरोधकांना भीती नाही कारण या निवडणुकीमध्ये शिवसेनेची बिहारमध्ये जी अवस्था केली तशीच शिवसेनेची अवस्था महाराष्ट्रात राऊत करतील ही आम्हाला खात्री आहे" असं ट्विट केलं आहे.
"शिवसेनेचं डिपॉझिट गुल, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कुठे आहे आपला चमत्कार?"
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "बिहारमध्ये शिवसेनेचं डिपॉझिट गुल. १ टक्का मतं देखील नाहीत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कुठे आहे आपला चमत्कार?" असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.