मुंबई - मुंबई पोलिसांचा पगार आता एचडीएफसीबँकेत होणार असल्याची माहिती मिळत आहे. याआधी मुंबई पोलिसांना अॅक्सिस बँकेतून पगार मिळत होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2017 साली अॅक्सिस बँकेत मुंबई पोलिसांचे पगार करण्याबाबत करार करण्यात आला होता. या कराराची मुदत 31 जुलै 2020 रोजी संपली आहे. त्यानंतर राज्य सरकारने एचडीएफसी बॅंकेत पगार करण्याचा निर्णय घेतला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यामध्ये आता यावरून ट्विटर वॉर रंगलं आहे.
'संधीसाधू दलबदलूंना प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम काय समजणार?' असं म्हणत अमृता फडणवीस यांनी प्रियंका चतुर्वेदी यांना टोला लगावला आहे. "एका गोष्टीचा मला पुनरुच्चार करायचा आहे, अॅक्सिस बँकेच्या सरकारी विभागाकडून (आधीची UTI बँक) पोलीस खात्यांचे संपादन करण्याचा निर्णय केवळ बँक तंत्रज्ञान आणि सेवेच्या आधारावर होते. 29 ऑक्टोबर 2005 रोजी यासंबंधी शासन आदेश निघाला होता. घाणेरडे राजकारण प्रामाणिक आणि कणखर व्यक्तींना फसवू शकत नाही" असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.
'राज्य सरकारी कर्मचार्यांच्या पगाराची खाती रातोरात हलवण्यात आली होती'
शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी "मुंबई पोलीस लवकरच अॅक्सिस बँकेतून 50 हजार पोलिसांची पगार खाती हस्तांतरित करतील. मनमानी करुन ज्या पद्धतीने बँकेची निवड करत राज्य सरकारी कर्मचार्यांच्या पगाराची खाती रातोरात हलवण्यात आली होती. हे लक्षात घेता हा निर्णय आवश्यकच होता" असं ट्विट केलं आहे. चतुर्वेदी यांच्या या ट्विटला अमृता फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
'संधीसाधू दलबदलूंना प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम काय समजणार?'
"अॅक्सिस बँक ही माझी घरगुती बँक नाही, ही खासगी क्षेत्रातील तिसर्या क्रमांकाची मोठी बँक आहे. मी त्यातील एक कर्मचारी असून त्याच बँकेसाठी 18 वर्ष काम केले आहे. संधीसाधू दलबदलूंना हा प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम कसे समजतील? ही खाती 2005 आधारित तंत्रज्ञान आणि सेवांनुसार प्राप्त झाली होती" असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. पोलिसांच्या पगारासंदर्भात अॅक्सिस बँकेतील एमओयू 31 जुलैला संपल्यानंतर नवीन बँकेचे प्रस्ताव आले होते. त्यामध्ये एचडीएफसीने दिलेल्या प्रस्तावात अधिक सुविधा मिळत असल्याने या बँकेची निवड करण्यात आली आहे. HDFC बँकेकडून मुंबई पोलिसांना उत्तम सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे, गृह विभागाने हा निर्णय घेतला असून अॅक्सिस बँकेतून होणाऱ्या पगारी वर्ग केल्या आहेत.
पोलिसांना मिळतील या सुविधा
नैसर्गिक किंवा कोविडमुळे मृत्यू झाल्यास 10 लाखांचे विमा संरक्षण, अपघाती मृत्यू आल्यास 1 कोटींपर्यंत विमा कवच, अपघातात विकलांग झाल्यास 50 लाख विमा कवच, अपघाती मृत्यूनंतर दोन अपत्यांना 10 लाख शिक्षणासाठी, रुग्णालयात उपचारांसाठी भरती झाल्यास 30 दिवसांपर्यंत प्रति दिन 1 हजार रुपये मदत अशा सुविधा मुंबई पोलीस दलातील कर्मचारी, अधिकार्यांना एचडीएफसी बँक देणार आहे.