.... आणि अशाप्रकारे अजित पवारांनी अप्रत्यक्षरित्या केले अमोल कोल्हेंच्या शिरुर उमेदवारीवर शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 03:59 PM2019-03-08T15:59:43+5:302019-03-08T16:01:19+5:30
ज्यांना तुम्ही टिव्हीत पाहता त्यांना फक्त पाहू नका तर, त्यांच्या नांवा समोरील बटन दाबा...
शिरूर: तुम्हाला हवा, तोच उमेदवार आम्ही देणार आहोत. शिरूर लोकसभेच्या उमेदवारोबाबत जनतेची पसंती शरद पवारांना कळवली जाईल व साहेबच उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेतील. मात्र, त्यानंतर पवार यांनी ज्यांना तुम्ही टिव्हीत पाहता त्यांना फक्त पाहू नका तर, त्यांच्या नावासमोरील बटन दाबा असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केली.
न्हावरे ( ता . शिरूर ) येथे राष्ट्रवादीतर्फ आयोजित संवादयात्रा कार्यक्रमात पवार बोलत होते.त्यांनी आपल्या तासाभराच्या भाषणात मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. पवार यांनी भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात शिरूर लोकसभेसाठी आमदार विलास लांडे,माजी आमदार पोपटराव गावडे, सुर्यकांत पलांडे,देवदत्त निकम आदी उमेदवार इच्छुक आहे. आता तुम्हाला जो उमेदवार पसंद आहे त्याचे नाव घेतल्यावर हात वर करा असे आवाहन केले.पवारांनी सगळ्यांची नांवे घेतली. पण एकही हात वर येईना.विलास लांडे यांचे नाव घेतल्यावर ठराविकच लोकांनी हात वर केले. पवार यांनी सर्वात शेवटी अमोल कोल्हे यांचे नांव घेतले. आणि उपस्थितांपैकी सर्वांनीच जल्लोषात हात वर केले. यावर पवार म्हणाले, तुम्हाला हवा, म्हणजेच जनतेला हवा तोच उमेदवार आम्ही देणार आहोत. शिरूर लोकसभेच्या उमेदवारोबाबत जनतेची पसंती शरद पवारांना कळवली जाईल व ते निर्णय घेतील. यानंतर मात्र पवार यांनी ज्यांना तुम्ही टिव्हीत पाहता त्यांना फक्त पाहू नका तर, त्यांच्या नांवा समोरील बटन दाबा असे सांगून अप्रत्यक्षरित्वा कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केली.यामुळे उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या लांडे यांचा माग हिरमोड झाला.
मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली असे सांगताना पवार यांनी, सध्या जी युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, तिथे शंकेची सुई फिरत असल्याचे वक्तव्य केले. ते म्हणाले,अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेन, भारतात लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काही तरी घडेल असे सांगितले होते, राज ठाकरेही अशी परिस्थिती निर्माण केली जाईल म्हणाले होते.यामुळे सध्या घडलेल्या घटना शंकास्पद असल्याचा आरोप पवार यांनी केला. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार विलास लांडे अतुल बेनके, माजी आमदार अॅड. अशोक पवार, पोपटराव गावडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .