मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी शिवसेनेने चांगलाच चकवा दिला. यात्रेच्या निमित्ताने शिवाजी पार्कातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर आदरांजली वाहायला आलेल्या राणे यांच्याकडे शिवसेनेने पूर्णपणे दुर्लक्ष केले. आधी जाहीर केलेल्या विरोधाच्या भूमिकेला वळसा घालत शिवसेनेने संघर्ष तर टाळला आणि आपल्यामुळे राणेंवर प्रसिद्धीचा झोत पडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी मुंबईतील भाजपचे दिग्गज नेते, पदाधिकारी उपस्थित होते. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राणे यांच्या माध्यमातून शिवसेनेला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न होता. जनादेश यात्रेत राणे हे शिवाजी पार्कातील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन करणार असल्याचे भाजपने जाहीर केले होते. त्यावर अपेक्षेप्रमाणे शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रिया आली.
नारायण राणे यांना स्मृतिस्थळावर येऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी लागलीच जाहीर केली होती. त्यामुळे राणे विरुद्ध शिवसेना असा नवा संघर्ष होणारच, अशी अटकळ बांधली जात होती. शिवसैनिकांकडून विरोधासाठी काही ना काही क्लृप्ती लढविली जाणार, असेही बोलले जात होते. गुरुवारी मात्र शिवसेनेने राणे यांच्या यात्रेकडे साफ दुर्लक्ष करत या सगळ्या दौऱ्यातील हवाच काढून घेतली. राणे हे केंद्रीय मंत्री असून, त्यांना असलेल्या सुरक्षा व्यवस्थेमुळे स्मृतिस्थळावर जाण्यापासून त्यांना रोखता येणार नव्हतेच. शिवाय, राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असल्याने काळे झेंडे दाखवून, विरोध वगैरे करून संघर्षाची स्थिती निर्माण करणे सोयीचे नव्हते. कायदा सुव्यवस्थेचे खापर शिवसेनेवरच फुटले असते.
शिवाय, एकाही शिवसैनिकाने उत्साह दाखवून काही केले असते तर प्रसिद्धीचा सगळा झोत राणे आणि त्यांच्या यात्रेवर गेला असता. यासाठी माहिम, दादरसह आजूबाजूच्या परिसरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना प्रभादेवी येथे महापौरांच्या कार्यक्रमाकडे पाठविले. तसेच, यात्रा सुरू होण्यापूर्वीच स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी 'वरून आदेश नाहीत’, असे माध्यमांसमोर जाहीर करून टाकले. स्मृतिस्थळावर अनेक लोक येतात तसे राणेही येतात. त्यात काही वेगळे नाही. तिथे आदरांजली वाहायला येणाऱ्यांना का रोखायचे, असेही ते म्हणाले. राणे आणि भाजपला आयते कोलीत द्यायचे नाही, याची पुरेपूर काळजी सेना नेतृत्वाने घेतली. तसेच, स्मृतिस्थळावरील राणे यांच्या आदरांजलीनंतर शेवटी यावेच लागले ना, असा सूर समर्थकांनी सोशल मीडियावर आवळला.
शुद्धीकरणाचा घाट- राणे यांच्यासह भाजप नेत्यांनी दुपारी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर आदरांजली वाहिली. त्यानंतर सायंकाळी तीन-चार स्थानिक शिवसैनिकांनी स्मृतिस्थळाच्या शुद्धीकरणाचा घाट घातला. - येथील बाळासाहेबांची प्रतिमा पाण्याने धुऊन, त्यावर दूध ओतण्यात आले. गोमूत्र शिंपडून धूप दाखविला. शिवाय, चाफ्याची फुले वाहिली गेली. - ही वास्तू अपवित्र झाली, इतक्या वर्षांत बाळासाहेब दिसले नव्हते का, आम्ही ठाकरे कुटुंबाबद्दल निष्ठा राखणारे शिवसैनिक आहोत. - त्यामुळे आम्ही हे सहन करू शकत नाही, असे स्मृतिस्थळावर आलेल्या शिवसैनिकाने सांगितले.