नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी राष्ट्रीय ध्वजाविरूद्ध केलेल्या वादग्रस्त विधानावरुन दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मेहबुबा मुफ्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी दिल्ली पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी शुक्रवारी वादग्रस्त विधान करताना म्हणाल्या होत्या की, आम्हाला आमचा जम्मू-काश्मीर ध्वज परत मिळेपर्यंत तिरंगा ध्वज हाती धरणार नाही. मेहबुबा यांच्या विधानावर संतप्त झालेल्या सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदल यांनी मेहबुबा यांच्याविरूद्ध राष्ट्रीय सन्मान कायद्यासह कलम १२१, १५१, १५३ए, २९५, २९८, ५०४, ५०५ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
विनीत जिंदल यांनी दिल्ली पोलिस आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या वादग्रस्त विधानाने लोकांना निवडून आलेल्या सरकारविरूद्ध भडकावले आहे. तसेच देशाच्या राष्ट्र ध्वजाचा अपमान केला. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. जोपर्यंत आमचा ध्वज परत मिळत नाही तोपर्यंत आम्ही दुसरा ध्वज उभारणार नाही असं वादग्रस्त विधान जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केलं आहे.
शुक्रवारी मेहबूबा मुफ्ती यांनी श्रीनगर येथे पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा देश, दोन ध्वजांचे राजकारण पुढे केले. सुरुवातीला मेहबुबा म्हणाल्या की, आम्ही कलम ३७० पुन्हा आणणारच आणि असे होईपर्यंत मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. यासोबतच मेहबुबा यांनी भारताच्या राष्ट्रीय ध्वजाबद्दल अपमानास्पद भाष्य केले. जेव्हा आमचा जम्मू काश्मीरचा झेंडा परत येईल तेव्हाच आम्ही तो (तिरंगा) ध्वजही घेऊ. तो ध्वज आमच्या आयुष्याचा एक भाग आहे, तो आमचा ध्वज आहे. या ध्वजासोबत आमचं नातं आहे असं मेहबुबा म्हणाल्या.
काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुला यांनीही असंच वादग्रस्त विधान केले होते, काश्मिरी लोकांना मोदी सरकारवर विश्वास राहिला नाही अशी लोकांची मानसिकता आहे. फाळणीच्या वेळी खोऱ्यातील लोकांना पाकिस्तानमध्ये जाणे सोपे होते, परंतु त्यांनी गांधींजींचा भारत निवडला होता मोदींचा भारत नाही. आज चीन दुसर्या बाजूने पुढे सरकत आहे. जर आपण काश्मिरींशी चर्चा केली तर बरेच लोक चीनने भारतात यावं असं म्हणतायेत. चीनने मुस्लिमांचे काय केले हे त्यांना ठाऊक असूनही ते असं म्हणत आहेत, मी यावर फारसा गंभीर नाही परंतु मी प्रामाणिकपणे सांगतोय ते लोक ऐकायला तयार नाहीत असं फारुक अब्दुला म्हणाले होते.