मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानाजवळ ठेवण्यात आलेल्या स्फोटकांप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक झाल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरची कोंडी झाली आहे. त्यातच या प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाल्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचाही राजीनामा घेण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आज दिवसभर राजीनाम्याची चर्चा विविध प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्यानंतर संध्याकाळी अनिल देशमुख यांनी आपल्या राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. (Anil Deshmukh finally spoke on the discussions of resignation, tweeting that the news of resignation is baseless)याबाबत केलेल्या ट्विटमध्ये अनिल देशमुख म्हणाले की, आज मी विदर्भातील महत्वपूर्ण अशा मिहान प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मागील दोन दिवसांत मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणाविषयी एटीएस आणि एनआयएने केलेल्या तपासाची चर्चाही झाली. दरम्यान इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझ्या राजीनाम्याच्या ज्या बातम्या दाखवण्यात आल्या,त्यात कोणतेही तथ्य नाही, असेही अनिल देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.