मुंबई – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(Param Bir Singh) यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे धक्कादायक आरोप लावले होते, या प्रकरणात अनिल देशमुखांना खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं आहे. हायकोर्टाने या प्रकरणाची १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआय(CBI) दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुखांनी नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे भाजपा नेत्यांना ठाकरे सरकारवर टीका करण्याची आयती संधी सापडली होती.
या प्रकरणावर भाष्य करताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे उद्धव ठाकरे सरकारचं पितळ उघडं पडलं. देशाने पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवताना आणि गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं आहे असा टोला त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे. स्वातंत्र्य भारतात असं कधीही घडलं नव्हतं. आता या प्रकरणात अनेकजणांची नावं पुढे येतील. उद्धव ठाकरे सरकारने याची जबाबदारी घ्यायला हवी असं त्यांनी म्हटलं आहे.(Prakash Javdekar Target Mahavikas Aghadi government over Anil Deshmukh Resigination)
तसेच शरद पवार देशाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी अनिल देशमुखांवर आरोप झाले असताना त्यांना क्लीनचीट देणं न समजण्यासारखं आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन यात सहभागी असणाऱ्यांवर कारवाई व्हावी असं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं आहे.
काय होता परमबीर सिंगाचा आरोप?
मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी वाझेला महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते. असा आरोप करीत राज्याच्या राजकारणात आणि पोलीस दलात खळबळ उडवून दिली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा धक्कादायक आरोप त्यांनी केला होता.
राजीनामा पत्रात अनिल देशमुख काय म्हणाले?
मा.ना. श्री. उद्धव ठाकरेसाहेब,
मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेत आज दि. ५ एप्रिल रोजी पारित केलेल्या आदेशान्वये अर्जावर सीबीआयमार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यानुसार मी गृहमंत्री पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या उचित वाटत नाही. म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. मला मंत्री (गृह) पदावरून कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती.
आपला नम्र,
अनिल देशमुख
शरद पवारांचे विश्वासू शिलेदार नवे गृहमंत्री
अभ्यासू आणि नम्र लोकप्रतिनिधी अशी ओळख असलेले दिलीप वळसे पाटील हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघाचे सातव्यांदा आमदार आहेत. याआधी त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, ऊर्जामंत्रिपद तसेच विधानसभेचे अध्यक्षपद सांभाळले आहे.