Maharashtra Breaking News : 'एक साधा प्रश्न राज्यातील जनतेला पडलाय, भाजपशी संबंधित असलेला प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?', असा सवाल करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) खिंडीत पकडलं आहे. बदलापूरमध्ये अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर 'देवाचा न्याय' देवेंद्र फडणवीसांचे कौतूक केले जात आहे. त्याचा उल्लेख करत देशमुखांनी सवाल केला आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला. या घटनेने राज्यातील राजकारण तापले आहे. या घटनेबद्दल महायुती समर्थक देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक करत आहेत. देवाचा न्याय असा हॅशटॅगही ट्रेंड होतोय.
अनिल देशमुख काय म्हणाले?
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. बलात्कार प्रकरणातील एका पदाधिकाऱ्याचे भाजपातून निलंबन करण्यात आल्याचे आणि तो फरार असल्याबद्दलचा हा व्हिडीओ आहे.
व्हिडीओ पोस्ट करताना अनिल देशमुखांनी म्हटले आहे की, "सागर बंगल्यावरचा बॉस आपल्या पाठीशी आहे, हा विश्वास राज्यातल्या बलात्कार्यांना आहे म्हणूनच भाजपचे बलात्कारी नेते हे धाडस करत आहेत. नालासोपाऱ्यात 22 वर्षीय तरुणीवर भाजपच्या पदाधिकाऱ्याने वर्षानुवर्षे अत्याचार केले. आजही हा आरोपी फरार आहे. एक साधा प्रश्न राज्यातील जनतेला पडलाय, भाजपशी संबंधित असलेला प्रत्येक आरोपी फरार कसा होतो? #DevachaNyay (देवाचा न्याय) इथे होणारं आहे की नाही?", असे सवाल अनिल देशमुखांनी केले आहेत.
नितेश राणेंकडून केल्या जाणाऱ्या विधानाचा उल्लेख
भाजपाचे आमदार निलेश राणे अनेक भाषणांमध्ये आमचा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे. पोलीस माझं काहीही करू शकत नाही, असे म्हटले आहेत. त्याचा उल्लेखही अनिल देशमुख यांच्याकडून करण्यात आला आहे.
डोक्यात गोळी लागल्याने अक्षय शिंदेचा मृत्यू
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा डोक्यात गोळी मारण्यात आली होती. अति रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पोस्टमार्टेम रिपोर्टमधून या बाबी समोर आल्या आहेत. दरम्यान, विरोधकांकडून आता शाळेचे संचालक भाजपाचा पदाधिकारी असल्याने त्याला वाचवण्यासाठी एन्काऊंटर करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या एन्काऊंटरचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. सीआयडीने तपास सुरू केला आहे.