राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंग यांनी आरोपात नमूद केलेल्या तारखेला अनिल देशमुख क्वारंटाईन असल्याचा दावा केला. पवारांची पत्रकार परिषद सुरू असतानाच भाजप नेत्यांनी अनिल देशमुखांचा एक व्हिडिओ रिट्विट करुन पवारांच्या दावा फोल असल्याचं म्हटलं आहे. अनिल देशमुखांनी १५ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ भाजपनं रिट्विट केला आहे. याच ट्विटचा संदर्भ देत आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुखांच्या अटकेची मागणी केलीय. (sudhir mungantiwar demanding anil deshmukh arrest)
"कोरोना असताना जर राज्याचा एक जबाबदार नेता पत्रकार परिषद घेत असेल तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अनिल देशमुख यांना तात्काळ अटक केली पाहिजे. यातून राज्यातील जनतेसमोर कोरोना प्रतिबंधक नियमांचा आदर्श प्रस्थापित होईल", असा खोचक टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवारांनी दिल्ली पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुखांवरील आरोप फेटाळून लावल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन पवारांना प्रत्युत्तर दिलं.
"शरद पवारांच्या म्हणण्याप्रमाणे अनिल देशमुख १४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीपर्यंत क्वारंटाइन होते. तर १५ फेब्रुवारी रोजी देशमुखांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ त्यांच्या ट्विटरवर आहे. त्यातले अनिल देशमुख हे दुसरे कुणी आहेत का? याचं उत्तर पवारांनी द्यावं", असं मुनगंटीवार म्हणाले. "गुन्हा कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी गुन्हा तो गुन्हाच असतो. तो उघड झाल्याशिवाय राहत नाही. पवारांकडून देशमुखांना वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे", असंही मुनगंटीवार म्हणाले.
फडणवीसांकडून 'ते' ट्विट रिट्विटशरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांनी १५ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ तात्काळ रिट्विट केला आणि पवारांचा दावा फेटाळून लावला. "शरद पवार यांच्या दाव्यानुसार अनिल देशमुख १५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत क्वारंटाइन होते. पण १५ फेब्रुवारी रोजी अनिल देशमुखांनी त्यांचे सुरक्षारक्षक आणि माध्यम प्रतिनिधींच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली होती", असं ट्विट फडणवीस यांनी केले आहे.