“होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी…” दानवेंच्या टीकेला अनिल देशमुखांचं खास शैलीत उत्तर
By प्रविण मरगळे | Published: October 7, 2020 05:13 PM2020-10-07T17:13:08+5:302020-10-07T17:15:00+5:30
BJP Raosaheb Danve, Home Minister Anil Deshmukh News: रावसाहेब दानवेंच्या टीकेला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टोला लगावला
मुंबई – शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे राज्यातील आघाडी सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनीचे सरकार आहे अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती, पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते, मात्र या टीकेला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खास शैलीत उत्तर दिलं आहे. रावसाहेब दानवे म्हणत आहेत ते बरोबर आहे असं सांगत त्यांनी चिमटा काढला आहे.
याबाबत अनिल देशमुखांनी ट्विट केले आहे की, महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो, कारण - होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथनी! अशा खास शैलीत त्यांनी समाचार घेतला आहे.
.@raosahebdanve म्हणाले की, #महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथोनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो, कारण - होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथोनी !
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) October 7, 2020
काय म्हणाले होते रावसाहेब दानवे?
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे राज्यातले आघाडी सरकार म्हणजे अमर अकबर अँथनीचे सरकार आहे, आम्हाला हे सरकार पाडायचं नाही, परंतु तेच एकमेकांच्या पायात पाय घालून पडले तर आम्ही तरी काय करणार असा टोला त्यांना महाविकास आघाडीला लगावला होता.
केंद्राच्या शेती विधेयकांना महाराष्ट्रातच कोणताच विरोध नाही हे दिसत आहे, डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारशींचीच या विधेयकातून अंमलबजावणी झालेली आहे. खुद्द शरद पवार यांनीही विधेयकातील मुद्द्यांचा आग्रह धरला होता. त्यांचा तोच जुना व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चिला जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं, आम्हाला विरोधकांची भीती नाही पण त्यांच्या अपप्रचाराबाबत आम्ही स्पष्टीकरण नक्की देऊ असं दानवे म्हणाले.
तसेच सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात भाजपाच्या हस्तक्षेपामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली नसल्याचं दानवेंनी सांगितले. हाथरस येथील घटना अतिशय वाईट असून या घटनेचे कोणीही समर्थन करणार नाही, या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याने सुरुवातीला तिथे कोणाला जावू दिले नाही, मात्र ही चौकशी पूर्ण झाल्यावर सर्वांना तेथे जाऊ दिले. मात्र हाथरस प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारची भूमिका, भाजपा खासदाराने घेतलेली आरोपींची भेट यासंबंधीच्या प्रश्नांना दानवे यांनी बगल दिली.