मुंबई - परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) चांगलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणावरून वाद वाढल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोर्चा सांभाळला आहे. दरम्यान, काल या प्रकरणाची माजी पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या शरद पवार यांनी आज अनिल देशमुख यांना थेट क्लीन चिट दिली. त्यावरून भाजपा खासदार मनोज कोटक (Manoj Kotak) यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘’अनिल देशमुख यांच्याकडे नेमकं कोणतं गुपित आहे? ज्यामुळे पवारांनी २४ तासांत भूमिका बदलली,’’ अशी विचारणा मनोज कोटक यांनी केली आहे. (What is the secret that Anil Deshmukh has? Which changed Sharad Pawar's opinion in 24 hours. ")
आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी अनिल देशमुख यांचा बचाव केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना मनोज कोटक म्हणाले की, शरद पवार यांनी कालपर्यंत या घटनेवर हालचाली करत बैठका घेत या प्रकरणावर निर्णय मुख्यमंत्री घेणार, हा अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे, असे सांगितले होते. मात्र आज मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचे काम शरद पवार करत आहेत. शरद पवार आता म्हणत असतील की अनिल देशमुख यांचा राजीनामा होणार नाही, तर मग कालपर्यंत राजीनामा घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, असे ते का म्हणत होते. याचा अर्थ अनिल देशमुख यांच्याकडे कुठली अशी माहिती आहे का, की ज्याच्यामुळे परमबीर सिंग यांना बाजूला केल्यावर त्यांनी पत्र बाहेर काढलं, त्याप्रमाणे अनिल देशमुख यांनी असं काही सांगितलं का की ज्यामुळे शरद पवार यांना आपली भूमिका बदलावी लागली, असा सवाल मनोज कोटक यांनी उपस्थित केला.
दरम्यान,परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज अनिल देशमुख यांच्याकडून गृहमंत्रिपदाचा राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच परमबीर सिंग यांनी आरोप केलेल्या काळात अनिल देशमुख हे कोविडवर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल होते आणि नंतर होम क्वारेंटाइन होते, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. मात्र शरद पवार यांचा हा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ आणि ट्विट शेअर करत खोडून काढला होता.