मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयनं एफआरआर दाखल केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्या प्रकरणात सीबीआयनं देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. याशिवाय देशमुख यांच्या घरासह त्यांच्या १० मालमत्तांवर सीबीआयनं छापे टाकले आहेत. मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे इथल्या मालमत्तांवर सीबीआयचं छापासत्र सुरू आहे.अनिल देशमुखांविरोधात FIR दाखल, १० मालमत्तांवर सीबीआयची धाड; अडचणी वाढणारअनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या असताना भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. 'सचिन वाझे २००० कोटींची वसुली गँग प्रकरणात आता अनिल देशमुखांवर कारवाई होतेय. मंत्री अनिल परब यांचीही थोड्या दिवसात हीच स्थिती होईल. आणखी २ मोठे नेते लाभार्थी आहेत. २ हजार कोटी गोळा झाले. ते कुठे कुठे गेले? आता सीबीआय कारवाई करतेय. ईडी तपास करतेय. एनआयए आहे. पुढील काही दिवसांत आयकर विभागदेखील येईल. उद्धव ठाकरेंना २ हजार कोटींच्या वसुलीचा हिशोब द्यावा लागेल,' असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
अनिल देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप करून परमबीर सिंग यांनी खळबळ उडवून दिली होती. यानंतर प्रकरण न्यायालयात गेलं. अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या प्रकरणी सीबीआयनं १४ एप्रिलला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं.
या प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत अनिल देशमुख यांचे दोन स्वीय सहाय्यक (संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे), निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंचे दोन चालक, बार मालक, मुंबई पोलीस दलातील अधिकारी यांची चौकशी केली आहे.