चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी किमान ६० जागा मिळाव्यात, असा आग्रह भाजपने धरला असला तरी आपण २१ मतदारसंघच तुमच्यासाठी सोडू शकू, त्याहून अधिक जागा सोडणे शक्य नसल्याचे अण्णा द्रमुकने स्पष्ट केले आहे.
राज्यात अण्णा द्रमुकशी आघाडी करण्याचे भाजपने ठरविले आहे. अण्णा द्रमुकने पीएमकेसाठी २३ जागा सोडल्या असून, तामिळ मनिला काँग्रेस व डीएमडीकेसाठी १५ जागा सोडल्या जातील. त्यामुळे भाजपला २१ जागाच देता येतील, असे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी व उपमुख्यमंत्री ओ. पी. पन्नीरसेल्वम यांनी रविवारी रात्री अमित शहा यांना सांगितले.
राज्यात विधानसभेच्या २३४ जागा आहे. या तीन पक्षांना मिळून ३८ व भाजपला २१ जागा सोडल्यानंतर अण्णा द्रमुकला सुमारे १७५ जागाच लढवता येतील. पक्षाची ताकद व इच्छुकांची संख्या पाहता या जागा फारच कमी आहेत. त्यामुळे याहून अधिक जागांसाठी भाजपने आग्रह धरू नये, अशी अण्णा द्रमुकची इच्छा आहे.
द्रमुक काँग्रेस चर्चा सुरूराज्यात द्रमुक, काँग्रेस व डावे पक्ष यांचीही आघाडी असून, जागावाटपाबाबत सोमवारी बोलणी सुरू झाली. द्रमुकचे नेते टी. आर. बालू हे काँग्रेस व डाव्या पक्षांशी चर्चा करीत आहेत. या आघाडीत वायको यांचा एमडीएमके व मुस्लीम लीग हेही आहेत.
आठ टप्प्यांत मतदान निर्णयाला आव्हानकोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक आठ टप्प्यांमध्ये घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात सोमवारी याचिकेद्वारे आव्हान दिले गेले. वकील एम.एल. शर्मा यांनी केलेल्या या याचिकेत म्हटले आहे की, घटनेतील कलम १४ (जगण्याचा हक्क) आणि कलम २१ (जगण्याचा हक्क)चे उल्लंघन होत असल्यामुळे आठ टप्प्यांत निवडणूक घेण्यास आयोगाला प्रतिबंध करणारा आदेश दिला जावा.